1 ऑक्टोबरपासून ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ आणि RC मध्ये ‘हे’ बदल होणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वाहन चालकांसंबंधित महत्वपूर्ण निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. नव्या मोटर वाहन कायदा 2019 नुसार यानंतर वाहन परवाना आणि नवीन गाडी घेणाऱ्या ग्राहकांच्या गाडीचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटमध्ये (आरसी) मोठा बदल करण्यात येणार आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून वाहन परवाना आणि आरसी एक सारखेच असतील. यामुळे यानंतर वाहन परवाना आणि आरसी कार्डचे डिझाइन आणि सिक्युरिटी फिचर्स एक सारखेच असतील. असे असले तरी जुन्या वाहन परवाना आणि आरसीकार्ड धारकांसाठी सरकारकडून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत.

वाहन परवान्यात असणार मायक्रो चिप आणि क्यूआर कोड
या नव्या नियमानुसार, वाहन परवाना आणि आरसीकार्डमधील माहितीही सारखीच असेल. स्मार्ट वाहन परवाना तसेच आरसीकार्डमध्ये मायक्रो चिप आणि क्यूआर कोड असेल. त्यामुळे वाहनाच्या मालकाचे नाव ही आता लपवता येणार नाही. हे दोन्ही कार्ड आता सारखेच दिसणार असून त्याची प्रिटींग देखील सारखीच असेल.

क्यूआर कोर्डमुळे केंद्रीय डेटा बेसद्वारे चालक आणि वाहनाची माहिती प्राप्त करणे सोपे होईल. क्यूआर कोर्डला रिड करण्यासाठी वाहतूक पोलिसांना हँण्डी ट्रॅकिंग डिवाईसही उपलब्ध करुन देण्यात येईल. ज्यामुळे हे काम आणखीच सोपे होईल. तसेच वाहन परवान्यांच्या मागे आपत्कालीन स्थितीसाठी संपर्क क्रमांक देखील देण्यात येणार आहे.

देशातील सर्व वाहन चालकांचा सेंट्रल ऑनलाइन डेटाबेस तयार करण्यात येईल, अशी महिती सरकारने दिली आहे. केंद्राकडून मागील वर्षीच या संबंधित सूचना मागवल्या होत्या. त्यानंतर सर्व पक्षांच्या मतांप्रमाणे सरकारने निर्देश दिले आहेत.

Visit : policenama.com