UPI वरून होणाऱ्या व्यवहारावर नाही आकारले जाणार कोणत्याही प्रकारचे शुल्क, जाणून घ्या काय म्हणते NPCI

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : यूपीआय (UPI) वापरकर्त्यांसाठी महत्वाची माहिती आहे. 1 जानेवारी 2021 पासून कोणत्याही ग्राहकांना यूपीआयमार्फत (UPI) कोणत्याही प्रकारचे चार्ज द्यावे लागणार नाहीत. मात्र, यूपीआय (UPI) वापरकर्त्यांकडून 1 जानेवारीपासून अतिरिक्त शुल्क आकारेल, अशी बातमी माध्यमांत येत आहे. माध्यमांच्या या वृत्तावर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (National Payment Corporation of India) (एनपीसीआय) म्हटले आहे की, यूपीआय व्यवहारावर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे 1 जानेवारी 2021 पासून यूपीआय (UPI) व्यवहारावर अतिरिक्त शुल्क आकारण्यात येईल या बातम्या चुकीच्या आहेत.

शुक्रवारी एनपीसीआयने ट्वीटद्वारे माहिती दिली की, ‘एनपीसीआय स्पष्टीकरण देऊ इच्छित आहे की 1 जानेवारी 2021 पासून यूपीआय व्यवहारांबद्दलची बातमी पूर्णपणे बनावट आहे.’ त्यांनी या ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, ‘5 नोव्हेंबर 2020 च्या आमच्या प्रसिद्धीपत्रकाचा किंमती किंवा शुल्क निश्चित करण्याशी काही संबंध नाही.’

दरम्यान, गेल्या वर्षी 5 नोव्हेंबरपासून 1 जानेवारी 2021 नंतर यूपीआय पेमेंटवर अतिरिक्त शुल्क वसूल करण्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. तसेच एनपीसीआयने तृतीय पक्षाच्या अ‍ॅप प्रदात्यांद्वारे चालवल्या जाणार्‍या यूपीआय पेमेंट सेवेवर अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्याचे नमूद केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार एनपीसीआयच्या या नवीन नियमाचा परिणाम गुगल पे आणि फोनपे वापरकर्त्यांवर होऊ शकतो. त्याच वेळी, पेटीएमला या व्याप्तीमधून वगळले आहे.

माध्यमांच्या या बातम्यांचे खंडन करत एनपीसीआयच्या वतीने ट्वीट करुन माहिती दिली आहे की, यूपीआयच्या देयकावरील अतिरिक्त शुल्काबाबत मीडियामध्ये येत असलेली बातमी चुकीची आहे. एकंदरीत, डिजिटल पेमेंट करणार्‍या वापरकर्त्यांसाठी एक दिलासाची बातमी आहे की त्यांना यूपीआयमार्फत देयकावर कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.