मराठा आरक्षणाच्या पार्श्वभुमीवर राज्यात महत्वाच्या हालचाली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील अतिशय संवेदनशील राजकीय अन् सामाजिक मुद्दा असलेल्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला आहे. आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजातील विविध घटकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच मराठा आरक्षण रद्द करणारा सुप्रीम कोर्टाचा निकाल दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया बहुतांश राजकीय पक्षांनी दिली आहे. दरम्यान मराठा समाजाला भविष्यात पुन्हा आरक्षण देता येईल का याबाबत ठाकरे सरकारकडून चाचपणी सुरु आहे. तसेच या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर आज दिवसभरात राज्यात महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या आहेत.

अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी 4 वाजता मराठा आरक्षण उपसमितीची बैठक झाली. बैठकीत मराठा आरक्षणाबाबत आगामी काळात नेमक्या कोणत्या पद्धतीने वाटचाल करायची, याबाबतची रणनीती ठरवण्यात आली. तर दुसरीकडे भाजपकडून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे.

बैठकीला चंद्रकांत पाटील, नारायण राणे, आशिष शेलार आणि विनायक मेटे यांच्यासह इतरही नेते उपस्थित आहेत. दरम्यान तसेच मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी समाजाला संयम बाळगण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर ते आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती मैदानात उतरण्याची शक्यता आहे. याबाबतचे संकेत देणारे ट्वीट त्यांनी केले आहे. मराठा आरक्षण प्रश्नाबाबत माझी भूमिका लवकरच जाहीर करेने अशी माहिती संभाजीराजेनी दिली आहे.