शेतकर्‍यांसाठी महत्वाची बातमी ! प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2020-21 मध्ये सहभाग नोंदविण्यासाठी 31 जुलैपर्यंत अंतिम मुदत

बारामती : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2020-21 पासून तीन वर्षाकरीता राज्यात राबविण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पीकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, शेतकऱ्यांना नाविण्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, कृषि क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरून उत्पादनातील जोखमीपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा पीकांचे विविधीकरण आणि कृषि क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हेतू साध्य हाण्यास मदत ही योजनेची उद्दीष्ट्ये आहेत.

 

 

 

 

सदर योजना ही अधीसूचीत केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पीकांसाठी असेल, कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ऐच्छिक आहे, अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पीकांसाठी खातेदाराचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडे पट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत, या योजनेंतर्गत सर्व पिकांसाठी 70 टक्के जोखीमस्तर निश्चित करण्यात आला आहे, या योजनेंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार असून शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी 2.0 टक्के, रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के व नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे, ही या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

या योजनेंतर्गत पुढील कराणांमुळे होणाऱ्या पीकांच्या नुकसानीस विमा संरक्षण दिले जाईल. यामध्ये हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पीकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पीकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणी पर्यंत कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर , क्षेत्र जलमय होणे, भूसख्खलन, दुष्काळ पावसातील खंड, किड व रोग यामुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्ती मुळे होणारे पीकांचे नुकसान, नैसर्गिक कारणांमुळे पीकांचे होणारे काढणी पश्चात नुकसान इत्यादी. या योजनेमध्ये बारामती तालुक्या करीता बाजरी, भूईमूग , तूर , सोयाबीन व कांदा इत्यादी पीकांचा समावेश करण्यात आला आहे.

योजनेच्या अधिक माहितीसाठी विमा कंपनी , एच.डी.एफ.सी, इरगो इन्शुरन्स कंपनी, पुणे (विमा कंपनी प्रतिनिधी – शेखर कपाले, मो.नं :- 7387979793) तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा, राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा, नजिकचे विविध कार्यकारी सोसायट्या, कृषि खात्याचे कृषि सहाय्यक व कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, बारामती यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. या योजनेमध्ये सहभाग नोंदविण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2020 पर्यंत आहे. गर्दी टाळण्यासाठी अंतिम दिनांकाची वाट न पाहता त्यापूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिक विमा हप्ता भरण्याची कार्यवाही करावी असे आवाहन, तालुका कृषि अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी केले आहे.