सरकारी नोकरीच्या शोधत असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी ! ‘महाभरती’ची प्रक्रिया सुरु होण्यास एप्रिल ‘उजाडणार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महापरिक्षा पोर्टलकडील विद्यार्थ्यांच्या माहितीचे हस्तांतरण केले जाणार असून या प्रक्रियासाठी दीड महिन्यांचा कालावधी लागणार असून महाभरती प्रक्रिया एप्रिलपासून सुरु होण्याची शक्यता आहे. कारण शासकीय विभागांतील रिक्त पदांमुळे कामकाजात येणारे अडथळे, सुशिक्षित बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर महाभरतीसाठी आता सक्षम अशी खासगी एजन्सीची नियुक्ती केली जाणार आहे. दरम्यान आता महाभरतीचे नियोजन कसे राहणार, एजन्सीची नियुक्ती कशी करायची याची माहिती देण्यासाठी शासन स्तरावरुन सुस्पष्ट परिपत्रक काढले जाणार आहे.

विद्यार्थांच्या तक्रारीनंतर लोकप्रतिनिधींनी पोर्टल बंद करण्याची मागणी केली होती त्यानंतर ठाकरे सरकारकडून हे पोर्टल बंद करण्यात आले परंतु महाभरती कशी राबवायची असा प्रश्न उपस्थित झाला होता. यावर तोडगा काढण्यााठी 21 तारखेला म्हणजेच शुक्रवारी महाआयटीच्या सचिवांच्या अध्यक्षतेत अधिकाऱ्यांची बैठक झाली. यादरम्यान सुस्पष्ट निर्देश काही दिवसात राज्य सरकार देणार असून त्यानुसार महाडीबीटीने नियोजन करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

महाभरतीसाठी नियुक्त एजन्सीची क्षमता व तांत्रिक पडताळणीचे काम महाआयटीकडे असेल. तत्पूर्वी महापरिक्षा पोर्टलवरील विद्यार्थ्यांचा डाटा महाडीबीटीला हस्तांतरीत केला जाईल. नियुक्त एजन्सी मार्फत राबविल्या जाणाऱ्या परीक्षा व निकाल यावर महाडीबीटीचे नियंत्रण असेल. या प्रक्रियेसाठी दीड महिन्यांचा अवधी लागणार असून एप्रिलपासून महाभरतीला सुरुवात होईल अशी शक्यता महाडीबीटीने व्यक्त केली आहे.

सक्षम एजन्सी निवडणार –
राज्य सरकारच्या निर्देशानुसार महापरीक्षा पोर्टल बंद झाल्याने आता पोर्टलकडील डाटा महाआयटी व जेईडीकडे हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्यातील रिक्‍त पदांच्या भरतीसाठी खासगी एजन्सीचे निविदेद्वारे प्रस्ताव मागवून त्यापैकी एक सक्षम एजन्सीची निवडली जाईल. भरती प्रक्रियेची रुपरेषा ठरविणे व एजन्सी नियुक्‍तीची प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी महाआयटीकडे आहे.
                                           अजित पाटील (मुख्य कार्यकारी अधिकारी, महाआयटी, मुंबई)

मेगाभरतीचे आगामी नियोजन –
– रिक्त पदांच्या भरतीसाठीच्या नियोजनाबाबत लवकरच सुस्पष्ट शासन निर्णय येईल.
– विद्यार्थींची माहिती महाआयटीकडे हस्तांतरीत करण्यात येईल.
– निविदेद्वारे खासगी एजन्सीचे प्रस्ताव मागवणार – त्यांची तांत्रिक आणि क्षमता पडताळणी होणार.
– अर्ज मागवणे, परिक्षा घेणे आणि निकाल लावण्यापर्यंतची जबाबदारी महाडीबीटीकडे असेल.
– सर्व प्रक्रिया दीड महिन्यात पूर्ण करुन महाभरतीला सुरुवात करण्याचे सचिवांचे निर्देश