‘मी पाय चाटणाऱ्यातला नाही’ ! जाणून घ्या एकनाथ खडसेंच्या पत्रकार परिषदेतील 15 महत्त्वाचे मुद्दे !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयावर एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा विधासनभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. आपण कोणावरही नाही फक्त देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर नाराज असल्याचं ते म्हणाले आहेत. जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पक्षप्रवेशाची घोषणा केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

खडसेंच्या पत्रकार परिषदेतील 15 महत्वाचे मुद्दे –

1) कोणीही माझ्या राजीनाम्याची, चौकशीची मागणी केली नसताना राजीनामा घेतला गेला. सभागृहात कोणी असं सिद्ध केलं तर मी राजकारण सोडण्यास तयार आहे.

2) मी देखील पक्षासाठी उभं आयुष्य घालवलं. दगड धोंडे खाल्ले, लोकांनी मारलं, थुंकलं, वाळीत टाकलं अशा कालखंडातही आम्ही काम केलं. पक्षानं कमी दिलं असं नाही. परंतु मी देखील पक्षासाठी 40 वर्षे काम केलं. आजही माझी कोणाविरोधातही तक्रार नाही. माझी तक्रार वारंवार बोलून दाखवली आहे.

3) देवेंद्र यांनी ज्याप्रकारे विनयभंगाचा खटला दाखल केला, भूखंड प्रकरणी चौकशी लावली त्या सर्वांमधून मी सुटलो. परंतु मला मनस्ताप किती झाला. विनयभंगाचा खटला दाखल करणं, कोर्टात ते चालणं यापेक्षा मरण परवडलं. मी जेव्हा खटला दाखल करण्यासंबंधी देवेंद्रजींना विचारलं तेव्हा ते म्हणाले, ती महिला खूप गोंधळ घालत होती, टीव्हीवर दाखवलं जात होतं. म्हणून नाईलाजानं सांगितलं. नियमानुसार काम करा असं सांगता आलं असतं. मला बदनामी सहन करावी लागली. इतक्या खालच्या पातळीला जाऊन राजकारण झालं.

4) यानंतरही मी 4 वर्षे काढली. 9 महिने माझ्यावर आणि कथित पीएवर पाळत ठेवल्याचं मान्य केलं होतं. काय मिळालं काय नाही याचं दु:ख नाही. परंतु मनस्ताप झाला याचं दु:ख आहे.

5) आयुष्यात अनेक पदं ताकदीनं मिळवली आहेत. म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला. मी निर्णय स्वयंस्फूर्तीं घेतला आहे. जनतेची ताकद माझ्या पाठीशी आहे. महाराष्ट्रातील जनेतनं मला मोठा प्रतिसाद दिला आहे आणि आजही देत आहेत.

6) राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना किंवा काँग्रेसने कधीही माझ्या राजीनाम्याची मागणी केली नव्हती. तुम्ही एक प्रसंग दाखवून द्या.

7) मी फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहे. एका प्रकारे विनयभंगाचा खटला दाखल करणं तोही बनावट यापेक्षा वाईट काय. त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी फोन करणं त्यापेक्षा वाईट.

8) भ्रष्टाचाराचा आरोप वगैरे ठिके पंरतु विनयभंगाचा आरोप किती वाईट. मी सुटलो त्यातून नाही तर 3 महिने जेलमध्ये जावं लागलं असतं. बदनामी घेऊ गेलो असतो.

9) पदावर आहेत त्यांचं भाजपसाठी काय योगदान आहे अशी विचारणा करणार आहे. पक्षात घेतलेल्यांना मंत्रीपदं दिली. आम्ही 40 वर्षे घालवली परंतु पदासाठी लाचार नव्हतो. फडणवीसांनी आरोप करण्याआधी कोणीही आरोप केलेला असेल तर सांगा. माणसाला उध्वस्त करण्याचं काम यांनी केलं. त्यामुळंच पक्षत्याग करावा लागला.

10) फक्त फडणवीसांमुळंच आपण पक्ष सोडत आहोत.

11) मी आधीही विचारलं होतं आणि आजही माझा काय गुन्हा आहे ते पक्षानं स्पष्ट करावं.

12) मी लाचार नाही. कोणाचीही भीती बाळगणारा नाही. कोणाचे पाय चाटत बसणाऱ्यातला तर अजिबात नाही.

13) आपल्यासोबत एकही आमदार आमि खासदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार नाही. रक्षाताईंनी काय निर्णय घ्यावा हे त्यांनी ठरवावं. परंतु त्यांनी मला भाजप सोडणार नसल्याचं सांगितलं आहे. अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत.

14) भाजप सोडण्याच्या वेदना आहे. परंतु इतक्या खालचं राजकारण करणाऱ्यांसोबत काम करणं कठिण आहे. उद्या बलात्काराचा आरोप करतील.

15) राष्ट्रवादीकडून आपल्याला कोणतंही आश्वासन मिळालेलं नाही.