Sangli News : महाराष्ट्र राज्य हिंदी नाट्य स्पर्धेत सांगलीकरांची बाजी

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्य हिंदी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. त्यामध्ये सांगलीकरांनी बाजी मारली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या चिंतामणीनगर शाखेच्या ‘रुद्राली’ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक मिळाले. ‘रुद्राली’ या नाटकासाठी मिळालेले पारितोषिक हे त्या स्पर्धेतील दिग्दर्शनातील दिवंगत रंगकर्मी शफी नाईकवडी यांना ते मिळाले आहे.

महाराष्ट्र राज्य हिंदी नाट्य ह्या स्पर्धा पार पडल्यानंतर काही महिन्यांनी ज्येष्ठ रंगकर्मी शफी नायकवडी यांचे निधन झाले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकास व त्यांनाही बक्षीस मिळाल्याने सोशल मीडियावर मंगळवारी त्यांच्या आठवणींना कलाकारांनी उजाळा दिला आहे. पारितोषिक प्राप्त कलाकारांनीही त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून यशाचे श्रेयही त्यांना दिले. चिंतामणीनगर शाखेच्या ‘रुद्राली’ या नाटकासहित अन्य विभागांतही शाखेच्या कलाकारांनी चार बक्षिसे जिंकली आहेत.

रंगभूषा विभागात याच नाटकासाठी प्रसाद गद्रे यांना द्वितीय पारितोषिक मिळाले. उत्कृष्ट अभिनयासाठी प्रणिता भिताडे यांना रौप्यपदक, तर सांगलीच्या याच नाटकातील अनघा महाजन यांना गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले. दि. ३ फेब्रुवारी २०१९ ते ७ जानेवारी २०२० या कालावधीत विविध ठिकाणी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत एकूण ५७ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी सुहास भोळे, दिनेश श्रीवास्तव आणि श्रीमती कमल हवळे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सर्व पुरस्कार विजेत्यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.