पाकिस्तान हतबल ! संयुक्‍त राष्ट्रातील भाषणापुर्वीच इम्रान खान ‘पराजित’

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – संयुक्त राष्ट्रातील भाषणाबद्दल मी फार आशावादी नाही. यातून फार काही साध्य होईल असे काही वाटत नाही अशी उद्विग्न प्रतिक्रिया पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. काश्मीर मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर अपेक्षित मदत न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त करत आपण अपयशी झाल्याची कबुली देत संयुक्त राष्ट्र महासभेत भाषण करण्याआधीच इम्रान खान यांनी हार मानली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज संध्याकाळी 07:15 च्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएनजीएमध्ये भाषण करतील. त्यानंतर 8 वाजण्याच्या दरम्यान इम्रान खान यांचं भाषण होईल.

एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना इम्रान खान म्हणाले आहेत की, जम्मू-काश्मीरचा मुद्दा जगाने ऐकावा अशी माझी इच्छा आहे. पण मी आज जे भाषण करेन, त्याचा फारसा फायदा होणार नाही, याचीही मला कल्पना आहे. मी काश्मीरसाठी खास न्यूयॉर्कला आलो आहे. बाकी सर्व दुय्यम आहे. आम्ही मोठ्या संकटाच्या दिशेने चाललो आहोत हे जगाला कळत नाहीय. निर्बंध उठवण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारवर कुठलाही दबाव नाही. भारताने जम्मू-काश्मीरबाबत जो निर्णय घेतला तो नियमांना धरून नाही. संयुक्त राष्ट्र या प्रकरणात हस्तक्षेप करणार नसेल तर कोण करणार ?

जम्मू-काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांव्यतिरिक्त इतर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानने उपस्थित केला आहे, पण कोणीही त्याचे समर्थन करत नाही. काश्मीरच्या मुद्यावर जागतिक पातळीवर एकाकी पडलेल्या पाकिस्तानला एका पाठोपाठ धक्के बसत आहेत. तरीही पाकिस्तान अद्याप काश्मीरचा मुद्दा सोडण्यास तयार नाही.