काश्मीरच्या मुद्यावर जगाचा पाकिस्तान नव्हे तर भारतावर ‘विश्‍वास’, इम्रान खानच्या मंत्र्यानं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर भारत पाकिस्तान संबंध खूपच गरम झाले आहेत. दोन्ही स्तरातून यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. नुकतेच इम्रान खान सरकारमध्ये गृहमंत्री असलेल्या एजाज अहमद शाह यांनी पाकिस्तानला त्यांचा खरा चेहरा दाखवणारे वक्तव्य केले आहे.

एजाज अहमद शाह म्हणतात की पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर इतर देशाची मदत मिळवण्यामध्ये असमर्थ ठरला आहे. त्यामुळे बाकी देश आणि संपूर्ण जग आता पाकिस्तानपेक्षा भारतावर जास्त विश्वास ठेवत आहे. पाकिस्तानमधील बड्या लोकांनी देशाचा नाश केला आहे. काश्मीरच्या परिस्थितीवरील प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, आम्ही सांगतोय की भारताने काश्मिरात संचारबंदी लादली आहे, तिथे औषधे मिळत नाहीत पण जग आमच्यावर विश्वास ठेवत नाही, पण त्यांचा भारतावर विश्वास आहे.

आंतकवाद्यांच्या विरोधात होत असलेली कारवाई
शाह म्हणाले की, पाकिस्तानने जमात-उद-दावा अशा संघटनेवर करोडो रुपये खर्च केला. मात्र आता त्यांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. त्यांनी सांगितले की अशा संघटनांवर कारवाई करण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे. तसेच शाह यांनी सांगितले की याचाच परिणाम आहे जमात-उद-दावा संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद न्यायालयात खटला लढवत आहे.