औरंगाबादमधून एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील लढणार

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – वंचित विकास आघाडी आणि एमआयएम यांच्यात झालेल्या निर्णयानुसार औरंगाबाद लोकसभेची जागा एमआयएम लढविणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार एमआयएमचे पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबादहून आमदार इम्तियाज जलील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. हैदराबाद येथून रात्री उशिरा ही घोषणा करण्यात आली.

दारुस सलाम येथे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सोमवारी औरंगाबादमधील एमआयएम नगरसेवक, आमदार तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत जलील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर रात्री उशिरा हैदराबादमधील पक्षकार्यालयातून जलील यांच्या उमेदवारीची घोषणा झाली.

वंचित विकास आघाडीने या अगोदर माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांची औरंगाबाद येथून उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, वंचित विकास आघाडीने स्थानिक उमेदवार द्यावा, अशी मागणी करीत त्यांच्या उमेदवारीला एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता.

एमआयएमला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध असल्याने वंचित विकास आघाडीला एमआयएमचा पाठिंबा असला तरी ते महाराष्ट्रात कोणताही उमेदवार उभा करणार नव्हते. मात्र, आघाडीबरोबर समझोता न झाल्याने प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमने औरंगाबाद व मुंबईतील एक जागा लढवावी, असे कळविले होते. त्यानुसार औरंगाबादहून इम्तियाज जलील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

मुळचे पत्रकार असलेले इम्तियाज जलील हे २०१४ मध्ये एमआयएमच्या तिकीटावर औरंगाबादमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत.