औरंगाबादमध्ये शिवसेनचे खैरे आणि एमआयएमचे खा. इम्तियाज जलील यांच्यात ‘जुंपली’

औरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत औरंगाबादचा मतदार संघाचा निकाल धक्कादायक लागला होता अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना आपला बालेकिल्ला राखण्यात अपयश आले आणि त्याठिकाणी इम्तियाज जलील निवडून आले. ते पदभार स्वीकारतात न स्वीकारत तोच नव्या वादाला तोंड फुटले आहे. मानापमानाचं मोठं नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं.

महापालिकेच्या एका कार्यक्रमपत्रिकेत एमआयएमचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांचं नाव न लिहिल्यानं कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. सिद्धार्थ उद्यानात वाघिणीच्या चौथ्या बछड्यांचा नामकरण सोहळा होता. या सोहळ्यासाठी शहरातल्या आमदारांना आमंत्रण होतं.

विशेष म्हणजे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचं नाव छापण्यात आलं होतं. परंतु या कार्यक्रम पत्रिकेत नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांचे नाव टाकण्यास विसर पडल्याचे दिसून आले त्यामुळे महापालिकेत विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमने या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे.

यावर एमआयएमचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील काय उत्तर देतात हे आता बघावे लागेल.