लोकशाही धोक्यात, धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यावे : अमर्त्य सेन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

आगामी निवडणुकीत सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यायला हवे. कुहेतूने पछाडलेला पक्ष गेल्या निवडणुकीत विजयी झाला. त्यामुळे भारतातील लोकशाही धोक्यात आली आहे, अशी थेट आणि बोचरी टीका नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी भाजप सरकारवर केली आहे. सेन यांनी अशाप्रकारे मोदी सरकाला लक्ष्य केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. केंद्र सरकार, राजकीय-सामाजिक वातावरण या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4135fb93-a9bd-11e8-83c4-9f514ad57ff9′]

सेन म्हणाले, पश्चिम बंगालमधील एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी भाजपच पर्याय असे म्हणणे हे अजब तर्कट आहे. हुकूमशाही संपवण्यासाठी आपण धार्मिकतेचे बीज पेरायचे का? असे झालेच तर धार्मिकतेचे तण उपटून काढण्याची लढाई जिंकण्यासाठी भविष्यात अपार कष्ट घ्यावे लागतील. सध्या देशातील लोकशाही धोक्यात आहे. पण आपण परिस्थितीत सुधारणा करू शकतो. आपल्यावर प्रहार होतील, तरीही जनताच ही स्थिती बदलू शकते. बुडणारी बोट सोडून पळ काढणे हा उपाय नव्हे.

जेएनयूतील काही विद्यार्थ्यांवर राष्ट्रद्रोहाचा आरोप ठेवून अटक झाली. कोठडीत मारहाण झाली. ही बेकायदा कृती सर्वांनी पाहिली आहे. या घटनेत न्याय झाला नाही. अद्याप त्यांच्यावरील राष्ट्रद्रोहाचे आरोप सिद्ध झालेले नाहीत. भविष्यात नागरिकांवरही हाच बळप्रयोग होऊ शकतो. गेल्या लोकसभा निवडणुकीत ३१ टक्के मते मिळालेल्या पक्षाने ५५ टक्के जागा जिंकल्या. कुहेतूने पछाडलेल्या पक्षाने सत्ता मिळवली. बहुपक्षीय पद्धत लोकशाहीसाठी योग्य नाही, हे सिद्ध करणारे एकही उदाहरण माझ्या पाहण्यात नाही. एकपक्षीय पद्धतच लोकशाहीसाठी मारक आहे. इतिहासात अशा हुकूमशाही पद्धतीची अनेक उदाहरणे दिसतात. यासाठी आगामी काळात सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांची एकी व्हावी. देशातील लोकशाही धोक्यात आहे. हुकूमशाहीला विरोध करायला हवा. त्याविरोधात संघर्ष व्हावा. धार्मिक कट्टरता हाच देशासमोरील सर्वात मोठा धोका आहे. त्यापासून पळ काढू नका, असे सेन म्हणाले.