पहिल्यांदाच ! 3 सख्ख्या बहिणी, तिघींची IAS साठी निवड, तिघी बनल्या ‘या’ राज्याच्या मुख्य सचिव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   यास योगायोग म्हणा, चमत्कार म्हणा किंवा नशिब…नाव काहीही द्या, परंतु आहे तर हे एक अद्वितीय उदाहरण. ही गोष्ट आहे एकाच कुटुंबातील तीन बहिणींची. गोष्ट नाही, तर अशी हकीकत, ज्यावर सहजपणे कुणाचा विश्वास बसणार नाही. या तीन बहिणी आहेत, केशानी, मीनाक्षी आणि उर्वशी. या तीन बहिणींनी केवळ आयएएस परीक्षा पासच केली नाही तर, तिघीही हरियाणाच्या मुख्य सचिव पदाच्या खुर्चीपर्यंत वेगवेगळ्या कालावधीत पोहचण्यात यशस्वी झाल्या आहेत. या तीन बहिणींच्या यशस्वी आणि प्रेरणादायी अशा अद्भुत प्रवासाबाबत जाणून घेवूयात…

तिघी बहिणी हरियाणाच्या मुख्य सचिव

याबाबत वन इंडिया हिंदीने एक रिपोर्ट दिला असून त्यानुसार, केशानी आनंद अरोड़ा, मीनाक्षी चौधरी आणि उर्वशी गुलाटी या तिघी पंजाब युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर पदावरून सेवानिवृत्त झालेल्या जेसी आनंद यांच्या मुली आहेत. केशानी सध्या हरियाणाच्या मुख्य सचिव आहेत. आणि आश्चर्य म्हणजे असे करणारी जेसी आनंद यांची ती तिसरी मुलगी आहे. केशानीच्या अगोदर मिनाक्षी आणि उर्वशी सुद्धा हरियाणाच्या मुख्य सचिव पदावर राहिल्या आहेत.

1. केशानी आनंद अरोड़ा

मागच्या वर्षी 30 जूनला हरियाणाचे मुख्य सचिव पद मिळवणार्‍या केशानी 1983 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. हरियाणाच्या 33व्या आणि पाचव्या महिला मुख्य सचिव केशानी 30 सप्टेंबर 2020 पर्यंत या पदावर राहतील. या तीन बहिणींशिवाय हरियाणाच्या आणखी दोन महिला मुख्य सचिव प्रोमिला ईस्सर आणि शकुंतला जाखू आहेत. प्रोमिला 2007-08 मध्ये या पदावर होत्या, तर शकुंतला यांनी 2014 ही जबाबदारी सांभाळली. केशानी यांचा जन्म 20 सप्टेंबर 1960 रोजी पंजाबमध्ये झाला. पॉलिटीकल सायन्समधून एमए व एम फिल करणार्‍या केशानी आपल्या बॅचच्या टॉपर होत्या. त्या हरियाणा कॅडरच्या 1983 आयएएस बॅचच्या टॉपरसुद्धा होत्या. केशानी यांनी आस्ट्रेलिया येथील सिडनीमूधन एमबीएची डिग्री घेतली. एवढेच नव्हे तर, हरियाणा राज्य अस्तित्वात आल्यानंतर 16 एप्रिल 1990 ला त्या राज्याच्या पहिल्या महिला उपायुक्त सुद्धा बनल्या.

2. मिनाक्षी चौधरी

तीन बहिणींमध्ये सर्वप्रथम मिनाक्षी यांनी हरियाणाच्या मुख्य सचिव पदापर्यंतचा प्रवास पूर्ण केला. त्यांच्यानंतर अन्य दोन बहिणी उर्वशी आणि केशानी यांनी हे पद मिळवले. मिनाक्षी यांनी 8 नोव्हेंबर 2005 पासून 30 एप्रिल 2006 पर्यंत ही जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडली. मिनाक्षी 1969 बॅचच्या आयएएस अधिकारी आहे.

3. उर्वशी गुलाटी

तीन बहिणींमध्ये मिनाक्षी यांच्यानंतर उर्वशी गुलाटी यांनी हरियाणाच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी सांभाळली. 1975 बॅचच्या आयएएस अधिकारी उर्वशी यांचा कार्यकाळ 31 ऑक्टोबर 2009पासून सुरू झाला होता. यानंतर त्या 2012 ते 31 मार्च पर्यंत या पदावर होत्या.