भीषण अपघातात कारचालक ठरला सुदैवी

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – दारूच्या नशेत तो वेगाने कार चालवत होते, नशेची अंमल डोळ्यावर आला व त्याचे नियंत्रण सुटले, त्याची कार समोरुन विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाडीला धडकली. त्यात त्या गाडीची डिझेलची टाकी फुटली. संपूर्ण रस्त्यावर डिझेल सांडले. मात्र, या सर्व प्रकारात कारचालकाला हाताला किरकोळ लागले आहे. इतका भीषण अपघात होऊनही कारचालक सुदैवी ठरला. मारुती रामचंद्र पिसाळ (वय ४५, रा, कुरवली, ता. फलटण, जि. सातारा) असे या कारचालकाचे नाव आहे.

पिसाळे मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट कारने पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जात होते. वेळे येथे आल्यावर या कारचालकाचा वाहनवरील ताबा सुटला व ही कार विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर येऊन एका गाडीला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की याचा भयंकर मोठा आवाज संपूर्ण परिसरात झाला. या धडकेत गाडीचा चक्काचूर झाला. या अपघातातील दुसऱ्या गाडीची डिझेल टाकी फुटल्याने संपूर्ण रस्त्यावर डिझेल सांडले होते. हा कार चालक दारूच्या नशेत वाहन चालवित होता. त्यामुळेच वाहनावरील ताबा सुटला. परंतु या भीषण अपघातात हा कारचालक थोडक्यात बचावला. त्याच्या हाताला किरकोळ खरचटले असून तो पूर्णपणे दारूच्या नशेत होता.

हा अपघात घडला त्यानंतर रात्र गस्तीला असणारे पोलीस घटनास्थळी त्वरीत दाखल झाले व संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे.