वाहतूक पोलिसांशी वादातून रिक्षाचालकाने दारुची बाटली घेतली पोटात मारुन

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – सिग्नल तोडल्याने वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकाला अडविले. त्यातून झालेल्या वादात रिक्षाचालकाने दारुची बाटली फोडून तिने स्वत:च्या पोटावर मारुन घेण्याचा प्रयत्न केला. त्यात सहायक पोलीस उपनिरीक्षक जखमी झाले. ही घटना पुणे नाशिक रोडवरी देहूफाटा व मोशी येथे घडला.

याप्रकरणी रिक्षाचालक अक्षय बलभीम जाधव (वय ३०, रा. महादेवनगर, चिखली) याला अटक केली असून धिरेंद्र प्रताप सिंग (रा. तुलसीकुंज सोसायटी, देहुगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय किसन ठिगळे (वय ५२) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ठिगळे व ट्राफिक वार्डन तोडसम हे देहुफाटा येथे दुपारी २ वाजता वाहतूकीचे नियोजन करत होते. त्यावेळी चिखलीकडे जाणारे रोडवरील सिग्नल बंद असताना रिक्षाचालक अक्षय जाधव याने सिग्नल तोडून तो वेगाने चिखलीच्या दिशेने जाऊ लागला.

ट्राफिक वॉर्डन तोडसम यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता त्याने शिवीगाळ करुन तसेच पोलीस नाईक रोकडे यांच्याशी वाद घालून तो निघून गेला. तेव्हा ठिगळे व इतरांनी त्याचा पाठलाग करुन मोशी येथे अडविले. तेथे रिक्षाचालकाने ठिगळे यांच्याशी वाद घालून त्यांच्या डाव्या गालावर मारहाण केली. तसेच त्याच्याकडील काचेची दारुची बाटली जमिनीवर फोडून स्वत:च्या पोटावर मारुन जीवे मारुन घेण्याचा प्रयत्न केला. त्याला अडविताना ठिगळे हे जखमी झाले. पोलीस नाईक रोकडे, ट्राफिक वॉर्डन तोडसम यांच्याशी झटापट करुन व ठिगळे यांना मारहाण करुन सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल भोसरी पोलिसांनी जाधव याला अटक केली आहे.