आई-बापाला पाहवलं नाही लेकीचं ‘प्रेम’, प्रियकराला शेतात बोलवून केला ‘गेम’ ?

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – आंतरजातीय प्रेम प्रकरणातून 25 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. मुलीच्या प्रियकराला तिच्या आई-वडिलांनीच संपवल्याचे वृत्त समोर येत आहे. मुलीच्या आई-वडिलांनी मुलीच्या प्रियकराला शेतात बोलावून त्याला विष पाजलं. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील धूमेगावात घडली आहे.

जिजाबा गंगाराम कुलाळ असे मयत तरुणाचे नाव आहे. जिजाबाचे आई-वडील उसतोडणीला कोल्हापूरला गेले असताना त्याला गावाकडे बोलावून मारहाण करत विष पाजल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. मृत जिजाबाच्या अंगावर मारहाण केल्याची वण असल्याची माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली आहे. विष पाजल्यानंतर त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला.

जिजाबाला विष पाजून खून केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. जिजाबाच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी आरोपींना अटक करण्यात यावी यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात तीन तास ठिय्या आंदोलन केले. तसेच जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. या संपूर्ण प्रकरणाची नोंद पोलिसांत करण्यात आली असून पोलीस जिजाबाचा मृत्यू नेमका कसा याचा शोध घेत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/