दुर्दैवी ! अंबाजोगाईत ऑक्सिजन खंडीत झाल्याने 6 जणांचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा रुग्णालयावर आरोप

बीड : पोलीसनामा ऑनलाईन –   ऑक्सिजन गळती होऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याची नाशिकमधील घटना ताजी असतानाच आता बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ कोविंड रुग्णालयात बुधवारी (दि.21) अर्धा तास ऑक्सिजन खंडित झाल्याने 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र, हा आरोप रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी फेटाळला आहे.

ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे बीड जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे. अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. ऑक्सिजनचा पुरवठा घटल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या रुग्णालयात ऑक्सिजनची बेड संख्या 225 असून दररोज 800 सिलेंडरची मागणी आहे. मात्र, ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्याने लातूर, बीड या ठिकाणाहून ऑक्सिजन मागविण्यात आले आहेत. परंतु पुरवठा कमी असल्याने प्रशासन हतबल झाले आहे. त्यापाठोपाठ परळीतील रुग्णालयात देखील ऑक्सिजनची कमरतता आहे. बीड, अंबाजोगाई, परळी आणि आष्टी तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. आज सकाळपासूनच परळीतील रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे.