काँग्रेसच्या काळात १५ सर्जिकल स्ट्राईक झाले ; पण कधी राजकारण केलं नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा हल्ल्यानंतर केलेल्या हवाई हल्ल्याचे मोदी सरकार राजकारण करत आहे, असा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे . ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते . त्यावेळी त्यांनी काँग्रेस सरकारच्या काळात १५ वेळा सर्जिकल स्ट्राइक करण्यात आले. पण काँग्रेसने कधीच याचे राजकारण केले नाही, असं त्यांनी म्हटलं.

काँग्रेसच्या शासन काळात १५ वेळा सर्जिकल स्ट्राइक झाले. पण त्याचा राजकीय वापर कधी केला नाही, असा कायदाही नसतो. पण पंतप्रधान स्वत:चं धाडस असल्यासारखे दाखवत आहेत. इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे करत नवीन बांगलादेश बनवला. आपला जीव दिला पण खलिस्तान बनू दिला नाही. पण मोदी हे गांधी कुटुंबीयांबद्दल वाईट बोलण्याशिवाय दुसरे काहीच करत नाहीत, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयश आले. देशात मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा हे दोघेच राज्य करत आहेत. हे देशाचे दुर्भाग्य आहे. त्यामुळे लोकशाही धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे, देश संकटात आहे, असा घणाघात त्यांनी केला.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्यात २५ जागा मिळतील. जनतेचा विश्वास आमच्याबरोबर आहे. त्यामुळे कुशासनाचा अंत निश्चित आहे, असं ही त्यांनी यावेळी म्हटलं.