४४ लाखांच्या शिष्यवृत्ती घोटाळ्याप्रकरणात तत्कालीन प्राचार्य गजाआड

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाकडून शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. विद्यार्थ्यांची ४४ लाख ४८ हजार ९० रुपयांची शिष्यवृत्ती संस्थेच्या बँक खात्यात शासनाकडून जमा करण्यात आली होती. मात्र, ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली नाही. हा घोळ लक्षात येताच विद्यार्थ्यांनी लढा उभारला होता. याप्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका तत्कालीन प्राचार्यास आज (मंगळवार) अटक केली आहे.

वर्धा येथील नालवाडी येथील आश्रय बहुद्देशीय संस्थेच्या अमरावती येथील फुलवंताबाई इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्यूटर अँड इन्फॉर्मेशनमधील हे प्रकरण आहे. पोलिसांनी अटक केलेल्या प्राचार्याचे नाव गोपनीय ठेवले आहे. दीपाली अशोक चव्हाण (रा. नवसारी) या विद्यार्थिनीने २४ एप्रिल २०१८ रोजी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फुलवंताबाई इन्स्टिट्यूट आॅफ कम्प्यूटर अँड इन्फर्मेशनमध्ये सन २०११-१२ मध्ये १११ विद्यार्थ्यांनी डिप्लोमा इन वेब डिझायनिंग व डिप्लोमा इन ग्राफिक्स अँड अ‍ॅनिमेशन या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेतला होता.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाकडून शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. प्रतिविद्यार्थी ३९ हजार ९०० रुपयाप्रमाणे शासनाकडून ही शिष्यवृत्ती देण्यात आली. या शिष्यवृत्तीतून विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, निर्वाह भत्तासह अन्य सुविधा महाविद्यालयाकडून मिळणार होत्या. मात्र, महाविद्यालयाकडून एकाही विद्यार्थ्याला शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला नाही. संस्थेने एक वर्षाचे प्रशिक्षण एक ते दीड महिन्यातच उरकविले. त्यांना प्रमाणपत्रही दिले नाही.