‘कोरोना’ व्हायरस दरम्यान Parle-G नं रचला इतिहास, मोडलं 82 वर्षांचे रेकॉर्ड, आठ दशकात सर्वोत्तम 3 महिने

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   लॉकडाऊनमध्ये अनेक बड्या कंपन्यांचे नुकसान होत असताना बिस्किट तयार करणार्‍या पार्लेने एक नवीन विक्रम नोंदवला आहे. पार्ले-जी बिस्किटची इतकी विक्री झाली आहे की गेल्या ८२ वर्षातील विक्रम मोडला आहे. अवघ्या ५ रुपयांत मिळणारे पार्ले-जी बिस्किटाचे पॅकेट शेकडो किलोमीटर चालत जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांसाठी उपयुक्त ठरले आहे. काहींनी स्वत: विकत घेऊन खाल्ले, तर काहींनी मदत म्हणून बिस्किटांचे वाटप केले. तसे पार्ले-जी १९३८ पासून लोकांमध्ये एक आवडता ब्रँड आहे. परंतु लॉकडाऊन दरम्यान त्यांनी आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक बिस्किटांची विक्री करण्याचा विक्रम नोंदवला आहे. पार्ले कंपनीने सेल्स क्रमांक जाहीर केला नसला, तरी पण एप्रिल आणि मे हे त्यांच्यासाठी गेल्या ८ दशकातील सर्वोत्कृष्ट महिने असल्याचे ते म्हणाले.

एका वृत्तसंस्थेनुसार, पार्ले प्रॉडक्ट्सचे कॅटेगरी हेड मयंक शहा म्हणाले की, कंपनीचा एकूण मार्केट शेअर सुमारे ५ टक्क्यांनी वाढला आहे आणि यातील ८०-९० टक्के वाढ पार्ले-जीच्या विक्रीमुळे झाली आहे. पार्ले प्रॉडक्ट्सने त्यांच्या सर्वाधिक विक्री असणार्‍या आणि कमी किमतीचे ब्रँड पार्ले-जीवर लक्ष केंद्रित केले, कारण ग्राहकांकडून त्याला बरीच मागणी येत होती.

यामुळे वाढला खप

पार्लेसारख्या काही बिस्किट निर्मात्यांनी लॉकडाऊननंतर काही वेळातच कामकाज सुरू केले होते. यापैकी काही कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांच्या येण्या-जाण्याची सोय देखील केली होती, जेणेकरून ते सहज आणि सुरक्षितपणे कामावर येऊ शकतील. जेव्हा कारखाने सुरू झाले, तेव्हा या कंपन्यांचे लक्ष जास्त विक्री असणाऱ्या प्रॉडक्टचे उत्पादन तयार करण्यावर होते.

ही बिस्किटे देखील खूप विकली गेली

गेल्या तीन महिन्यांतील लॉकडाऊन दरम्यान अन्य कंपन्यांची बिस्किटेही खूप विकली गेली. तज्ञांच्या मते, ब्रिटानियाच्या गुड डे, टायगर, मिल्क बिकिस, बार्बोन आणि मारी बिस्किट्स व्यतिरिक्त पार्लेचे क्रॅकजॅक, मोनॅको, हाइड अँड सीक यांची देखील खूप विक्री झाली आहे.