बनावट आरोपी प्रकरणात RPF च्या निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित

पुणे (दौंड) : पोलीसनामा ऑनलाईन – दौंड लोहमार्ग न्यायालयात बनावट आरोपी उभे करणे निरीक्षकासह उपनिरीक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. लोहमार्ग न्यायालयात बनावट आरोपी उभा करून न्यायालयाची फसवणूक आणि कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी दौंड रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक बी.बी. सिरपोर आणि उप निरीक्षक एस.एस. लोंढे यांना निलंबित करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ८ जुलै २०१९ रोजी इंद्रजित महादेव यादव (रा. बालाजीनगर, लिंगाळी, दौंड) याने एका रेल्वे तिकीट परीक्षकाला मारहाण केली होती. त्याच्या विरुद्ध दौंड रेल्वे सुरक्षा दल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात उप निरीक्षक लोंढे यांनी यादव याच्या ऐवजी न्यायालयात रेल्वे स्थानकावर अनधिकृत फळविक्री करणाऱ्यास न्यायालयासमोर हजर केले. न्यायाधीश जी.एस. वर्पे यांना हजर करण्यात आलेला आरोपी आणि मूळ आरोपी यांच्या वयामध्ये तफावत आढळून आली. त्यामुळे न्यायालयाने आरोपीचे ओळखपत्र सादर करण्यास सांगितले असता ओळखपत्र सादर न केल्याने हा प्रकार उघडकीस आला.

न्यायालयाने फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर १६ ऑगस्टला रेल्वे सुरक्षा दलाने मूळ आरोपी इंद्रजित यादव याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावली. दरम्यान, लोहमार्ग न्यायालयाचे सहायक अधीक्षक गणेश राऊत यांनी शनिवारी (दि. १७) दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

सहायक अधीक्षक गणेश राऊत यांनी दिलेल्या फिर्य़ादीनुसार एस.एस. लोंढे, इंद्रजित यादव आणि बनावट आरोपी उभा करण्यात आलेल्या इसमाविरुद्ध न्यायालयाची फसवणूक केल्याची तक्रार केली. फिर्यादीमध्ये त्यांनी न्यायालयाची फसवणूक करुन बनावट आरोपी हजर करणे आणि शासकीय कागदपत्रामध्ये फेरफार केल्याची फिर्य़ाद दिली.

रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक बी. बी. सिरपोर आणि उप निरीक्षक एस. एस. लोंढे यांना निलंबित करण्यात आले असून त्या दोघांना रेल्वे सुरक्षा दलाच्या सोलापूर विभागीय मुख्यालयास संलग्न करण्यात आले असल्याची माहिती सहायक अधीक्षक गणेश राऊत यांनी सांगितले. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर उप निरीक्षक लोंढे फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त