Pimpri News : पिंपरी चिंचवड शहरात घरफोडीच्या 5 घटनांमध्ये 10.5 लाखांचा ऐवज लंपास

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपरी चिंचवड शहरामध्ये घरफोड्यांचे सत्र पुन्हा सुरु झाले आहे. मंगळवारी (दि.12) पाच घरफोडच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने, लॅपटॉप, मोबाइल, रोख रक्कम असा एकूण 10 लाख 47 हजार 198 रुपयांचा ऐवज चोरट्यांना पळवून नेला. गेल्या काही दिवसांत पुणे शहरात आणि परिसरात घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. त्यात दिवसा ढवळ्या अशा घटना घडल्याचे उघडकीस आले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दिघी, निगडी, एमआयडीसी भोसरी, शिरगाव आणि सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरफोडीच्या घटना घडल्या असून संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पहिली घटना निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. यामध्ये भानुदास विलास रानवडे (वय-46 रा. सेक्टर 25, किर्ती विद्यालय शेजारी प्राधिकरण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रानवडे यांच्या घराचे सेफ्टीडोअरचे लॉक तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला.चोट्यांनी घरातील सोन्याचे डायमंडचे दागिने, चांदीची भांडी, चांदीचे दागिने, हातातील घड्याळे, कॅमेरा, लॅपटॉप, टॅब व रोख रक्कम असा एकूण 7 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि.12) उघडकीस आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.एन. सोनवणे पुढील तपास करीत आहेत.

दुसरी घटना दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. यामध्ये एका 32 वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी फिर्यादी यांचा शिवतेज रेसिडेन्सी येथील बंद घराचा दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश कला. घरातील कपाटातील लॉकरमधील 1 लाख 49 हजार रुपये किंमतीचे नेकलेस, झुमके, चेन, सोन्याचे दागिने चोरून नेले. हा प्रकार मंगळवारी (दि. 12) दुपारी साडेबाराच्या सुमारास उघडकीस आला. पुढील तपास दिघी पोलीस करत आहेत.

तिसरी घटना भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेल्को रोडवरील सेंट्रल वेअर हौसिंग कार्पोरेशन येथे मंगळवारी (दि.12) दुपारी सव्वातीनच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी दत्तात्रय एकनाथ पवार (वय-29 रा. सिद्धिविनायक अपार्टमेंट, घनसोली, नवी मुंबई) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तर श्रीधर शशिकांत कांबळे (वय-19 रा. चंद्रमणी नगर जुनी सांगवी, औंध कॅम्प, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने सॉर्टेशन सेंटरमधून फिर्यादी यांचे 97 हजार 998 रुपये किमतीचे दोन वन प्लस मोबाईल चोरून नेले. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

घरफोडीची चौथी घटना शिरगाव पोलीस चौकीत दाखल करण्यात आला आहे. प्रशांत एकनाथ घारे (वय-35 रा. चांदखेड, ता. मावळ मुळ रा. घारेवाडी, ता. कराड) यांनी फिर्याद दिली आहे. घारे यांच्या घराचा कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील सोन्याचे बदाम, चेन, चांदीची जोडवी असा एकूण 40 हजार 200 रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेला. हा प्रकार मंगळवारी (दि.12) रात्री दहाच्या सुमारास उघडकीस आला. पुढील तपास शिरगाव पोलीस करीत आहे.

तर पाचवी घरफोडीची घटना सांगवी येथे घडली आहे. कुणाल देवराज चाळके (वय-21 रा. लक्ष्मी निवास, मधुबन सोसायटी, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे घराचा दरवाजा पुढे करून झोपले असताना चोरट्याने घराचा दरवाजा उघडून बेडवरील लॅपटॉप आणि मोबाइल चोरून नेला. हा प्रकार मंगळवारी (दि.12) दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आला. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.