NDA मधील ‘हा’ मोठा पक्ष भविष्यातही ‘मोदी २.०’ सरकारमध्ये सहभागी होणार नाही

पाटणा : वृत्तसंस्था – मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजप-जेडीयू आमनेसामने आले आहेत. भाजप-जेडीयूचा शपथविधी नुकताच पार पडला. मात्र या मंत्रिमंडळात नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाला एकही मंत्रिपद दिले नाही. तर नितीश कुमार यांनी संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या एकाही आमदाराला स्थान दिले नाही. त्यामुळे नितीश कुमार यांनी केंद्रात मिळालेल्या वागणुकीचा वचपा काढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मंत्रिमंडळातून भाजपला वगळले
लोकसभा निवडणुकीत जेडीयूने १६ जागा जिंकल्या आहेत. जेडीयूला केवळ एकच मंत्रीपद देण्याचे भाजपने निश्चित केल्याने नाराज झालेल्या नितीश कुमार यांनी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिला होता. आज रविवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंत्रिमंडळ विस्तार केला. मुख्यमंत्र्यांनी जेडीयूच्या ८ आमदारांना मंत्रिपद दिले, मात्र त्यातून भाजपला वगळले.

म्हणून भाजपचा मंत्रिमंडळात समावेश नाही
याबाबत नितीश कुमार यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी सर्व काही सुरळीत असल्याचे म्हटले. संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) काही आमदार लोकसभेवर निवडून गेल्याने त्यांच्या जागा रिक्त झाल्या होत्या. त्यामुळे हा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे असे स्पष्टीकरण जेडीयूकडून देण्यात आले आहे. जदयू’च्या कोट्यातील जागा रिकाम्या असल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. आम्ही एनडीएतील घटकपक्षांशी चर्चा करुनच हा निर्णय घेतला. त्यावेळी आम्ही भाजपच्या कोट्यातील मंत्रिपदांसाठी ही नावे मागवली होती. मात्र, भाजपने तुर्तास ही मंत्रिपदे रिक्त ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या नेत्यांचा समावेश नव्हता, असे नितीश कुमार यांनी स्पष्ट केले.

भविष्यातही मोदी सरकारमध्ये सहभागी होणार नाही
जेडीयू आता कधीच मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही असे जेडीयूचे प्रवक्ते केसी त्यागी यांनी आज रविवारी सांगितले आहे. सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारने मंत्रिमंडळात जेडीयू एक मंत्रीपद देऊ केले होते. सत्तेतील भागीदारीसाठी द्यायचे म्हणून एक मंत्रीपद नको, अशी भूमिका पक्षाच्या कोअर टीमने घेतली होती. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजप-जेडीयू आमनेसामने आले आहेत तसेच बिहारमध्ये नवीन राजकीय समीकरणे तयार होतील अशी चिन्हे दिसत आहेत.

bihar cabinet expansion post the union cabinet snub bjp ljp may not get cabinet portfolio