धक्कादायक …! कोजागिरीसाठी आणलेल्या हल्दीरामच्या दुधात आढळला प्लास्टिकचा चुरा 

गोंदिया: पोलीसनामा ऑनलाईन – कोजागिरी  पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोजागिरी साजरी करण्याकरिता मोठ्या प्रमाणात बाजारात दुधाची मागणी होत असते. पण याच सणांच्या काळात दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. आता नागपुरात कोजागिरी पौर्णिमेकरिता आणलेल्या दुधात चक्क प्लास्टिक पावडरचा चुरा आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यात हा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हे दूध नामांकित  हल्दीराम कंपनीचे असून 40 लिटर दूध कंपनीला परत पाठविण्यात आले आहे.
गावकऱ्यांनी या प्रकाराची तक्रार मध्यरात्रीच हल्दीराम कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तसेच महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार वेबपोर्टल वर केली आहे. दिवाळी तोंडावर आली असताना विविध दूध कंपन्या किंवा खाजगी व्यापारी दुधात भेसळ करत असल्याचे नेहमी ऐकायला मिळते मात्र हल्दीरामसारख्या नामांकित कंपनीच्या दुधात देखील भेसळ झाल्याचे समोर आल्याने विश्वास कुणावर ठेवायचा ? असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्याच्या धुकेश्वरी देवस्थानात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त हल्दीराम कंपनीचे 40 लिटर दूध आणले होते. एका खोल पात्रात ते दूध गरम करण्यासाठी ओतण्यात आले असता त्यातून फायबरसारखा दिसणारा प्लास्टिकचा चुरा आढळल्याने मोठी खळबळ उडाली असून याची तक्रार कंपनीकडे केली असून संबधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने हा दूध परत पाठविण्याचे आले आहे.
या संदर्भात आपले सरकार पोर्टल वर तक्रार दाखल झाली असून अन्न व सुरक्षा विभागाशी संपर्क केला असता घटना  स्थळावर जाऊन पंचनामा केल्याशिवाय काहीही बोलू शकत नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.