इंदापूर तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या झाली दुप्पट, प्रशासनाची चिंता वाढली

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – इंदापूर तालुक्यात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. शंभर पेक्षा कमी रुग्णसंख्या असताना शनिवारी (दि. 15) थेट दुपट्ट वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. तालुक्यात 708 जणांच्या तपासणीत 236 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातच जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत.

तालुक्यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे 11 मे पासून संपूर्ण लॉकडाऊन केला होता. त्यामुळे रुग्णसंख्या निम्म्याने कमी होऊन 100 पर्यंत आली होती. गेल्या आठवड्यात 235 असणारी रुग्णसंख्या शनिवारपर्यंत 100 च्या आत होती. मात्र शनिवारी अचानक रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. मात्र रुग्णसंख्या वाढतच आहे. तालुक्यात खाजगी रुग्णालयात दाखल कोरोना रुग्णांसाठी नातेवाईकांची धावपळ सुरु आहे. तालुक्यात आज अखेर ग्रामीण भागात 12 हजार 234 तर शहरी भागात 2 हजार 135 रुग्ण असून एकूण 14 हजार 595 रुग्ण बाधित झाले होते. त्यापैकी 320 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. तर 12 हजार 340 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.