सर्वपक्षीय बैठक : ‘ज्यांनी देशाकडे वाकड्या नजरेने पाहिलं त्यांना धडा शिकवला’ – PM मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनने आपल्या सीमेत घुसखोरी केली नाही, ना आपल्या कोणत्याही पोस्टवर कब्जा केला आहे. लडाखमध्ये भारताचे 20 वीर जवान शहीद झाले, पण भारत मातेवर ज्यांनी डोळे वटारून पाहिले त्यांना धडा शिकवला गेला. जल-थल-वायू सेना आपल्या देशाच्या रक्षणासाठी जे काही करायचे आहे ते करत आहे. आज आपल्या देशाची अशी क्षमता आहे कोणीही देशाच्या एक इंच जमिनीकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिला आहे.

यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, मागील वर्षी देशाने आपल्या सीमेच्या संरक्षणासाठी सीमा परिसरात पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे. नवीन बनलेल्या सुविधांमुळे विशेष करून एलएसीजवळ आपल्या सैन्याची पेट्रोलिंग क्षमता वाढवली आहे. त्यामुळे ज्या क्षेत्रावर पहिले आपली नजर जात नव्हती त्या ठिकाणी आपले जवान चांगल्यारितीने मॉनिटर करू शकत आहेत.

 

सर्वपक्षीय बैठकीतील मुख्य मुद्दे
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारला की, चिनी सैनिकांच्या घुसखोरीबाबत सरकारला कधी माहिती मिळाली ? चिनी सैनिकांनी कधी सीमेवर घुसखोरी केली. सरकारला प्रत्यक्ष ताबा रेषेवरील (LAC) फोटो उपग्रहाद्वारे मिळत नाहीत का ? बाहेरील गुप्तचर यंत्रणांनी LAC वरील हालचालींबाबत कुठलीही माहिती दिली नाही का ?
ममता बॅनर्जी यांनी म्हटले की, चीनमध्ये हुकूमशाही आहे. भारतात लोकशाही आहे. आपण एकजुटीने लढू. चीनला हरवू, भारताचा विजय होईल, ही वेळ एकजूट दाखवण्याची आहे. भारतीय बाजारांमधील चीनचा निकृष्ट दर्जाचा माल रोखला गेला पाहिजे. चिनी मालाला गुणवत्ता नाही आणि ते वस्तू टिकाऊ नाहीत.
नितीश कुमार म्हणाले, चीनविरोधीत देशात संतापाची भावना आहे. अशा प्रसंगी सर्वपक्षांनी एकजुटीने सरकारला साथ दिली पाहिजे. भारतीय बाजारांमधील चीनचा निकृष्ट दर्जाचा माल रोखला गेला पाहिजे. चिनी मालाला गुणवत्ता नाही आणि तो टिकाऊ नाही.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, भारताला शांतता हवी आहे. पण याचा अर्थ भारत दुबळा आहे असा होत नाही. चीनचा मूळ स्वभाव हा विश्वासघातकी आहे. भारत बलवान आहे आणि दुबळा नाही. शत्रुचे डोळे काढून हातात देण्याची सरकारमध्ये क्षमता आहे. आपण सगळे एक आहोत. आम्ही पंतप्रधान मोदींच्या सोबत आहोत. लष्कराचे जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी संरक्षण मंत्री शरद पवार म्हणाले, जवानांच्या बलिदानाचा सन्मान झाला पाहिजे. जवानांनी शस्त्र ठेवावेत की नाही हे आंतरराष्ट्रीय करारानुसार निश्चित केलं जातं. यामुळे अशा संवेदनशील प्रकरणी कराराचे पालन करणं गरजेचं आहे.
सीपीआय नेता डी राजा यांनी म्हटले की, आपल्याला सध्या परिस्थितित सांभाळून पाऊल टाकलं पाहिजे. भारताने आपल्या बाजूने यावे यासाठी अमेरिका सतत प्रयत्न करत आहे. मात्र भारताने अमेरिकेच्या आहारी जाऊ नये.
बीजू जनता दलाचे पिनाकी मिश्रा म्हणाले, चीनवर सरकारला कुठलीही कारवाई करायची आहे त्यासोबत आम्ही आहोत. आम्ही सकारसोबत आहोत आणि तेही कुठल्याही अटीशिवाय

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like