जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – कौटुंबिक वादातून लहान मुलासमोर दिराने आपल्या वहिनीच्या डोक्यात कुर्हाडीने वार करुन निर्घुण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. जळगावमधील पिंप्राळा उपनगरातील मयुर कॉलनीत शुक्रवारी रात्री ९ वाजता ही घटना घडली.
योगिता मुकेश सोनार (वय ३९) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी त्यांचा दीर दीपक लोटन सोनार (वय ३८) याला अटक केली आहे.
योगिता सोनार यांचे पती मुकेश लोटन सोनार यांचे सहा महिन्यांपूर्वीच यावल येथे अपघाती निधन झाले आहे. त्यानंतर आता आईचा खुन झाल्याने त्यांचा मुलगा आर्यन याने सहा महिन्याच्या अंतरात आईवडिलांना गमावले आहे.
योगिता सोनार या मयुर कॉलनीत सासू प्रमिला, दीर दीपक आणि मुलगा आर्यन यांच्यासह राहत होत्या. सहा महिन्यांपूर्वी त्यांचे पती मुकेश सोनार यांचा अपघाती मृत्यु झाला होता. मुकेश यांच्या मृत्युनंतर १६ दिवसांनी त्यांचे वडिल लोटन सोनार यांचेही ह्दयविकाराने निधन झाले होते. दरम्यान, त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरु होते.
शुक्रवारी रात्री सर्वांचे जेवण झाले. तयानंतर दीपक हा घरात भावाच्या काही फाईल्स पहात होता. त्यावरुन त्याचा व वहिनी योगिता यांच्यात वाद सुरु झाला. तेव्हा संतापलेल्या दीपकने पलंगामागे ठेवलेली कुर्हाड काढून योगिता यांच्या डोक्यात घाव घातले. त्यात योगिता यांचा जागीच मृत्यु झाला. हा सर्व प्रकार सासू प्रमिला व मुलगा आर्यन यांच्यासमोर घडला. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले़ पोलिसांनी दीपकला अटक करुन कुर्हाड ताब्यात घेतली. या प्रकाराने प्रमिला या सुन्न झाल्या. मुलगा आर्यन याने हा सर्व प्रकार कथन केला.