पकडलेला ४३ लाखांचा गुटखा पोलिसांकडून नष्ट

केज (बीड) : पोलीसनामा ऑनलाईन – पोलिसांनी कारवाई करुन जप्त केलेला ४३ लाख ६८ हजार २० रुपयांचा गुटका आज (सोमवार) न्यायालयाच्या आदेशानुसार केजमध्ये नष्ट करण्यात आला. नष्ट करण्यात आलेला गुटखा सहा महिन्यांपूर्वी पोलिसांनी पकडला होता. अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या देखत हा गुटखा जाळून नष्ट करण्यात आला.

केजचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांनी ५ सप्टेंबर २०१८ रोजी परराज्यातून एका टेम्पोमध्ये आणलेला २६ लाख ९७ हजार ६०० रुपयांचा गुटखा पकडला होता. तसेच पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे व त्यांच्या सहकाऱ्यांनी २३ ऑगस्ट २०१८ रोजी केज येथे १५ लाख पाच हजार ५२० रुपायांचा गुटखा, अमर आत्माराम काळे यांच्या घरातून एक लाख ९ हजार ८६० रुपयांचा तर चांद पाशा खुरेशी यांच्या घरातून ५६ हजार ९६० रुपयांचा गुटखा पकडला होता. गुटख्याचे पोते सील करून ठेवण्यात आले होते.

आज (सोमवार) न्यायालयाच्या आदेशानुसार हा सर्व गुटखा केज शहराजवळील गायरानात नष्ट करण्यात आला. यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी ऋषिकेश मरेवार, अनिकेत भिसे, केजचे सहायक पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे, फौजदार बाबासाहेब डोंगरे, फौजदार विलास जाधव व पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते.