Coronavirus : पहिल्यांदाच वाढण्याऐवजी कमी झाले ‘कोरोना’चे अ‍ॅक्टीव्ह रूग्ण, 24 तासात बरे झाले ‘विक्रमी’ 11 हजार बाधित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतात कोरोना व्हायरस संसर्ग दररोज वाढतच असून गेल्या २४ तासांत ७९६४ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. यादरम्यान २६५ लोकांचा मृत्यू झाला. इतक्या मोठ्या संख्येने कोणत्याही दिवशी कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला नव्हता. या दरम्यान एक चांगली बातमी अशी आहे की, गेल्या २४ तासांत रुग्णांच्या बरे होण्याचा देखील रेकॉर्ड झाला आहे. या दरम्यान ११ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आणि यामुळे पहिल्यांदा देशात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढण्याऐवजी कमी झाली आहे. भारतात शुक्रवारी ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ८९,९८७ होती, ती आता कमी होऊन ८६,४२२ वर आली आहे.

रिकव्हरी रेट मध्ये वाढ

शुक्रवारी ११,२६४ कोरोनाचे रुग्ण बरे झाले, जो आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. आतापर्यंत देशभरात ८२,३७० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. भारतात आता रिकव्हरी रेट ४७.४० वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे त्यात दररोज वाढ होत आहे. जेव्हा देशात पहिला लॉकडाऊन सुरू झाला होता तेव्हा रूग्णांचा रिकव्हरी रेट ७.१% होता. दुसर्‍या लॉकडाऊनमध्ये तो ११.४२% पर्यंत पोहोचला. यानंतर त्यात आणखी वाढ झाली आणि हा दर २६.५९ टक्क्यांवर पोहोचला. १८ मे रोजी लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला तेव्हा हा आकडा ३८% वर पोहोचला. आणि आता तो ४७ टक्क्यावर गेला आहे. येत्या काळात त्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

मृत्यूचे प्रमाणही कमी

इतर देशांच्या तुलनेत भारतात मृत्यूचे प्रमाणही खूपच कमी आहे. येथे कोरोनाच्या २.८६ टक्के रुग्णांचा मृत्यू होत आहे. या यादीमध्ये बेल्जियम सर्वात वर आहे. येथे १६.२४% रुग्णांचा मृत्यू होत आहे. फ्रान्समध्ये हा आकडा १५.३७% आहे. इटली आणि ब्रिटनमध्ये मृत्यूचे प्रमाण १४% पेक्षा जास्त आहे. तर अमेरिकेत ५.८३ टक्के रुग्णांचा मृत्यू होत आहे. येथे अलिकडच्या काळात ही आकडेवारी थोडी सुधारली आहे.

एका दिवसात सर्वात जास्त चाचण्या

तसेच आता भारतात चाचण्यांची संख्या देखील सातत्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत सर्वाधिक १२७७६१ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली असून हा आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे. तर आतापर्यंत भारतात ३६११५९९ चाचण्या घेण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांत दररोज दीड लाखाहून अधिक चाचण्या केल्या जातील, असा सरकारचा दावा आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like