आदर्शवतः ! बुलढाण्यात सासू-सासर्‍यांनी केलं सुनेचं कन्यादान

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – बुलढाणा जिल्ह्यातील सुनगाव (ता. जळगाव जामोद) येथील एका दाम्पत्याने आपल्या विधवा सुनेचे कन्यादान करून समाजासमोर आदर्श प्रस्थापित केला आहे. त्यामुळे या अनोख्या विवाहाची सध्या सर्वत्र चर्चा होत असून या दाम्पत्याचे कौतुक होत आहे.

शालिग्राम लक्ष्‍मण वानखडे आणि वत्सलाबाई शालिग्राम वानखडे असे या सासू-सासऱ्याचे नाव आहे. सुनगाव येथील शालिग्राम वानखेडे यांचा मुलगा संतोष वानखेडे याचा धामणगाव तालुका संग्रामपूर येथील राधा उमाळे हिच्यासोबत 16 मार्च 2020 रोजी विवाह झाला होता. मात्र दुर्दैवाने 31 ऑगस्ट 2020 रोजी संतोषचा विहिरीत पडून मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर राधा सासरी राहत होती. तिचे सासरे शालिग्राम आणि सासू वत्सलाबाई यांनी राधाचा मुलीप्रमाणे सांभाळ केला. त्यानंतर 6 मार्च रोजी राधा हिचा विवाह खेरडा येथील प्रशांत शत्रुघ्न राजनकार यांच्याशी नोंदणी पद्धतीने विवाह झाला.

विवाहा दरम्यान त्यांनी सूनेचे कन्यादान करून साऱ्यांनाच चकीत केले आहे. सुनेच्या विवाहासाठी ते गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न करत होते. अखेर त्यांनी चांगला वर शोधून तिचे लग्न लावून दिले आहे.