अडचणीच्या काळात गरजू व्यक्तीपर्यंत पोस्ट खात्याने पोहचवले पेन्शन

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे शक्य नसताना पोष्ट खाते मात्र आम जनतेच्या सेवेसाठी सज्ज आहे. अशा अडचणीच्या काळात गरजू व्यक्तीपर्यंत पोस्ट खाते घरपोहोच पोहोचले असून याचा सु:खद धक्का आज लासलगावच्या जेष्ठ नागरिकांना बसला.

आज दि.२ मे रोजी श्रीमती पार्वतीबाई धोत्रे रा.राधानगर लासलगाव यांना पोस्ट कर्मचारी बाजीराव कुंभार्डे व पोस्टमन अरुण काळे यांनी पेन्शनचे २७००० रुपये तसेच शास्त्रीनगर येथील श्रीमती बबाबई गुऱ्हाडे यांनाही लासलगाव पोस्ट ऑफीसकडून पेन्शनचे १०००० रुपये घरपोहोच करण्यात आले.

चांदवड डाक उपविभागात जेष्ठ नागरिकांना लासलगाव, विंचूर, वनसगाव, उगाव, पिंपळगाव येथे एकूण २ लाख १६ हजर ५०० रूपये पेन्शनचे घरपोच वाटप करण्यात आले आहे. याकामी पोस्ट कर्मचारी यांना डी.एस.यू.एन रेड्डी डाक अधीक्षक,मालेगाव व नितिन अहिरे डाक निरीक्षक चांदवड उपविभाग यांचे मार्गदर्शन लाभले तर दिलीप दिवेकर,अनिल सोनवने डाक आवेक्षक आदी यांनी परिश्रम घेतले.