ठाकरे सरकारची मोठी घोषणा ! ‘कोरोना’ चाचणीच्या दराबद्दल घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नाही. राज्यात (Maharashtra) खासगी प्रयोगशाळेत (private lab) होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे (corona test) दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले असून प्रति तपासणी सुमारे 200 रुपयांनी कमी करण्यात आले आहेत.त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी 980, 1400 आणि 1800 असा कमाल दर आकरण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे, अशी घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी केली आहे.

नव्या सुधारीत दरापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाही. 4500 वरुन 980 रुपयांपर्यंत इतके कमी दर निश्चित करुन सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.

कोरोना चाचण्याचे दर निश्चित करताना 3 टप्पे करण्यात आले असून प्रयोगशाळेत तपासणी केल्यावर 980 रुपये दर आकारण्यात येईल. कोविड सेंटर, रुग्णालये, क्वारंटाइन सेंटरमधील प्रयोगशाळा येथून सॅम्पल गोळा करुन तपासणी करण्यासाठी 1400 रुपये तर रुग्णाच्या घरी जाऊन सॅम्पल घेऊन तपासणी करण्यासाठी 1800 रुपये असा कमाल दर आता निश्चित करण्यात आला आहे, असेही टोपे यांनी सांगितले.

राज्यात कोरोना नियंत्रणासाठी चाचण्यांवर भर देण्यात असून प्रती दहा लाख लोकसंख्येमागे 70 हजार चाचण्या केल्या जात असून त्या वाढवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. जेणेकरुन कोरोनावर अधिक नियंत्रण मिळविता येईल. राज्यभरात सुधारित दरानुसार रुग्णांकडून पैसे आकारले जावेत यासाठी जिल्हाधिकारी, महापालीका आयुक्तांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन सुद्धा आरोग्य मंत्र्यांनी केले आहे.