करमाळयात तिरंगी लढतील 2014 ची पुनरावृत्‍ती ? राष्ट्रवादीचा उमेदवार कोण ?

करमाळा : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या करमाळा विधानसभा मतदारसंघामध्येच पक्षाला उमेदवार मिळत नसल्याचे दिसून येत आहे. करमाळा मतदारसंघात युतीची ताकद वाढली असली तरी राष्ट्रवादीसाठी मात्र ही अस्तित्वाची लढाई आहे. 2014 च्या अटीतटीच्या तिरंगी लढतीत शिवसेनेच्या नारायण आबा पाटील यांनी केवळ 357 मतांनी विजय मिळवून करमाळा मतदारसंघावर भगवा फडकवला होता. मात्र, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेल्या रश्मी बागल शिवसेनेत आल्याने नारायण पाटील यांची डोकेदुखी वाढली आहे. 2014 च्या निवडणुकीत संजयमामा शिंदे यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यांना भाजपने पाठिंबा दिला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 2014 निवडणुकीत शरद पवार यांचे खंदे समर्थक स्वर्गिय दिगंबर बागल यांच्या कन्या रश्मी बागल यांना रिंगणात उतरवले होते. मात्र, त्यांना नारायण पाटील यांच्याकडून निसटता पराभव पत्करावा लागाला होता. मागील पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी गेल्याने नाराज रश्मी बागल यांनी शिवबंधन बाधून शिवसेनेत प्रवेश केला. तर विजयसिंह मोहिते पाटील यांचे समर्थक असलेले नारायण पाटील हे यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर निवडणुक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने ही जागा शिवसेना सोडणार का हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

रश्मी बागल यांच्या शिवसेना प्रवेशामुळे नरायण पाटील गट नाराज झाला आहे. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे विद्यमान आमदाराला तिकीटीसाठी झगडावे लागणार आहे. रश्मी बागल गट मजबूत आणि ताकतवर गट म्हणून ओळखला जातो. त्यांच्याकडे असलेल्या दोन कारखान्याची परिस्थीती दैनिय असून शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नसल्याने त्यांना याचा फटका बसू शकतो. त्यातच त्यांनी राष्ट्रवादी सोडल्याने त्यांना मानणारा आणि राष्ट्रवादीचा सच्चा कार्यकर्ता दुखावला आहे.

यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेने रश्मी बागल यांना उमेदवारी दिल्यास विद्यमान आमदार नारायण पाटील बंडोखोरी करणार हे निश्चित मानले जात आहे. याचा फटका रश्मी बागल यांना मिळणार आहे. याउलट लोकसभा निवडणूक लढवलेले संजयमामा शिंदे हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे केल्याने त्यांना याचा फायदा होऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेत पराभव पत्करल्यानंतर ते विधानसभेत हा धोका घेण्याच्या तयारी नाहीत. त्यातच त्यांनी माढा मतदारसंघात निवडणूक लढवणार नसल्याचे घोषीत केल्याने ते करमाळा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे.

करमाळा विधानसभा मतदारसंघात नारायण पाटील, रश्मी बागल आणि संजयमामा शिंदे यांच्यात 2014 प्रमाणेच लढत होणार असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मात्र, मागील निवडणुकीत मतदारसंघावर भगवा फडवणारा शिवसेना पक्ष यावेळी काय भुमिका घेतो याकडे पहावे लागणार आहे. गेल्यावेळी एकमेकांच्या विरोधात लढलेले तिनही दिग्गज नेते यंदाच्या निवडणुकीत पुन्हा आमने सामने आले असून आता करमाळा येथील मतदारराजा कोणाच्या पारड्यात कौल टाकतो हे लवकरच समजेल.

Visit : Policenama.com