मावळात जुन्या भांडणातून बामनोलीत गाड्यांची तोडफोड

लोणावळा : पोलीसनामा आॅनलाइन – गावात किर्तनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक जमले असतानाच जुन्या भांडणातून मावळ तालुक्यातील बामणोली गावात दोन गटात मोठा वाद होऊन भाविकांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. यात चारचाकी आणि दुचाकी अशा ७ गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. टोळक्याला अडविणाऱ्या महिलेलाही त्यांनी मारहाण केली. ही घटना सोमवारी रात्री दहा वाजता घडली.

मावळ तालुक्यातील पवनानगर जवळ बामणोली या गावात कार्तिक महिन्यानिमित्त किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या महिन्यात सर्वच गावात किर्तन, भजनाचे कार्यक्रम करण्यात येतात. यावेळी बामणोली गावात किर्तनासाठी ३०० ते ३५० भाविक जमले होते. किर्तन सुरु असतानाच रात्री दहा वाजण्याच्या सुमारास बाहेरच्या बाजूला यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरुन गावातील ५ तरुण आणि इतर गावातील १० ते १५ जणांनी तेथे उभ्या असलेल्या चारचाकी व दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे किर्तनासाठी आलेल्या भाविकांमध्ये गोंधळ उडाला. या प्रकाराने ते इकडे तिकडे पळून जाऊ लागले. यावेळी या तरुणांना वंदना काळे यांनी अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी या महिलेलाही कमरेत लाकडाने मारहाण करुन जखमी केले. या घटनेची माहिती नागरिकांनी तातडीने ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले. तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले होते.

ऑईलचा टँकर उलटला, भीषण आगीच्या तांडवात होरपळून १ ठार 

याप्रकरणी वंदना काळे (रा. बामणोली) यांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनिकेत कांताराम काळे, हनुमंत काळे, सागर काळे, बाबुराव काळे (सर्व रा. बामणोली) यांच्यासह बाहेरच्या गावातील १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून फिर्यादी आणि ५ आरोपी हे गावातीलच असून त्यांच्यातील जुन्या वादातून हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात येत आहे. अनिकेत काळे व इतरांनी तुंग व इतर गावातील आपल्या साथीदारांच्या मदतीने ही तोडफोड केल्याचे पोलिसांनी सांगितले.