विवाह ईच्छूक तरुणीला बेशुद्ध करुन ७५ हजाराला विकले !

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – विवाह ईच्छूक तरुणीचे अपहरण करुन परराज्यात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चार जणांनी तरुणीला बेशुद्ध करुन तिला मध्यप्रदेशातील शहजानपूर येथे एका व्यक्तीला विक्री करुन तिचे लग्न लावून दिले. लग्नानंतर अपहरण झालेली तरुणी आणि तिचा पती कुटुंबासमेत बोलत असताना पतीने तुझ्या कुटुंबाने तुझी विक्री केल्याचे सांगितले. यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर अपहरण झालेल्या तरुणीने आणि तिच्या पतीने गिट्टीखदान पोलिसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी चार जणांविरुद्ध अपहरण आणि विक्रीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. ही घटना जुलै २०१८ मध्ये घडली असून या घटनेचा तब्बल सात महिन्यांनंतर उलगडा झाला.

२२ वर्षीय तरुणीने (रा. जगदीशनगर सध्या रा. शहजानपूर) नोंदविलेल्या तक्रारीनुसार, आरोपी आशा रोकडे, उषा रोकडे, चंदा गजभिये आणि त्यांचा एक साथीदार (सर्व रा गिट्टीखदान, जगदीशनगर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी आणि तरुणी हे शेजारी-शेजारी राहतात. तरुणीचे पालक तिच्या लग्नासाठी वर शोधत होते. याची माहिती आरोपींना मिळाली. त्यानुसार त्यांनी तरुणीच्या अपहरणाचा कट रचला. तरुणीसोबत ओळख वाढवून तिला वर शोधून देतो असे सांगून १४ जुलै २०१८ रोजी आपल्या घरी बोलावून घेतले. या ठिकाणी बोलत असताना तिच्या नाकावर रुमाल ठेवला. तरुणी बेशुद्ध झाल्यानंतर त्याच अवस्थेत तिला मध्य प्रदेशातील शहजानपूर येथे घेऊन गेले. या ठिकाणी अशोक सिसोदिया या व्यक्तीला तिची ७५ हजार रुपयांत विक्री केली. विक्री करताना आरोपींनी आपली ओळख आई आणि मावशी अशी सांगितली. तरुणीची विक्री करुन तिचे लग्न सिसोदिया याच्या सोबत लावून दिले.

सिसोदिया आणि तरुणीचा संसार सुरळीत सुरु होता. तरुणी आणि तिचा पती कौटुंबीक गप्पा करीत असताना त्यांच्या लग्नाच्या गोष्टी निघाल्या. त्यावेळी सिसोदियाने तुझी विक्री करताना कुटुंबीयांनी माझ्याकडून ७५ हजार रुपये घेतल्याचे सांगितले. तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला. तरुणीने आरोपी हे आपले नातेवाईक नसल्याचे पतिला सांगितले. यानंतर पती सिसोदिया सोबत तरुणीने शहजानपूर पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला सर्व प्रकार सांगितला. शहजानपूर पोलिसांनी याची माहिती गिट्टीखदान पोलिसांना दिली. त्यानंतर सिसोदिया दाम्पत्य नागपुरात पोहचले. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी आशा, उषा, चंदा आणि त्यांच्या एका साथीदाराविरुद्ध अपहरण करून तरुणीची विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.