किरकोळ कारणावरुन महाविद्यालयीन युवकांच्या दोन गटात राडा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरुन महाविद्यालयीन युवकांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली. एकमेकांच्या अंगावर दगड भिरकावल्याने महाविद्यालयासमोर एकच गोंधळ उडाला. या ठिकाणी उपस्थित विद्यार्थ्यांची पळापळ झाली. या घटनेची माहिती मिळताच जुनाराजवाडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आल्याचे पाहून दोन्ही गटातील युवकांनी घटनास्थळावरुन पळ काढला. हा प्रकार आज (सोमवर) शिवाजी पेठेत घडला. या हाणामारीच्या प्रकारामुळे परिसरात काहीवेळ तणावाचे वातावरण होते.

शिवाजी पेठ येथील एका महाविद्यालयात आज विद्यार्थ्यांची गर्दी होती. महाविद्यालय सुटल्यानंतर सर्व युवक महाविद्यालयासमोर उभे होते. त्याठिकाणी दोन गटांत एकमेकाकडे बघण्यावरुन जोरदार हाणामारी झाली. एकमेकांच्या अंगावर युवक भिडल्याने गोंधळ उडाला. परिसरातील रस्त्यावरील दगड एकमेकांच्या दिशेने भिरकावले गेले. या प्रकाराची माहिती पोलीस निरीक्षक मानसिंह खोचे यांना समजताच ते पोलिसांचा फौजफाटा घेऊन घटनास्थळी पोहचले. पोलिसांची चाहूल लागताच दोन्ही बाजूच्या युवकांनी दिसेल त्या रस्त्याने पळ काढला.

पोलीस गेल्यानंतर पुन्हा या परिसरात युवक जमल्याने तणाव पसरला. या परिसरात रोज वर्चस्ववाद, वैयक्तिक हेव्याद्याव्यातून हाणामारीचे प्रकार घडत असतात. पुढील तपास जुनाराजवाडा पोलीस करीत आहेत.