गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी मी राजकारणात : पंकजा मुंडे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात प्रथमताच ग्रामविकास खाते माझ्या सारख्या महिलेला मिळाले. त्यामुळे मी खेडो पाड्यांतील महिलांच्या डोक्यावरची घागर बंद केली, गावं हगणदारी मुक्त केली, गावागावात वाड्यावस्तींवर पाणी नेले, बचत गटांची उत्पादने अमेरिकेत नेली, कर्ज माफीसाठी मोर्चे निघत असताना महिला बचत गट प्रामाणिकपणे कर्ज फेडत असल्याचे दिसते. समाजातील वंचित घटकांचा विकास करण्याचे गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी मी राजकारणात आले आहे, असे प्रतिपादन महिला व बाल कल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भोसरी येथे केले.

शिवांजली सखी मंचने संयोजन केलेल्या आणि महेशदादा स्पोटर्स फाऊंडेशनने आयोजित केलेल्या ‘इंद्रायणी थडी’ चे उद्घाटन महिला व बाल कल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते भोसरीत शुक्रवारी (दि. 8) करण्यात आले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप, निमंत्रक आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, संयोजिका पूजा महेश लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, भाजप शहर प्रवक्ते अमोल थोरात, भाजपा प्रदेश महिला कमिटी सचिव उमा खापरे, स्थायी समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड, महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा स्विनल म्हेत्रे, शिक्षण मंडळ अध्यक्षा सोनाली गव्हाणे, ‘ई’ क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षा भीमाताई फुगे, ‘क’ क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षा नम्रता लोंढे आदींसह नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, आई मुला मुलींचे कौतुक करतेच, परंतू वडीलांनी मुलीला सन्मान दिला तर तिचा आत्मविश्वास वाढतो. आई वडीलांनी मुलींवर विश्वास ठेवला पाहिजे. आम्हा बहिनींना स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांनी पहिल्यापासूनच सन्मान दिला. महिला या आई, लक्ष्मी, सरस्वती, शक्तीचे रुप आहे. महिलांच्या सन्मानार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या संरक्षण खात्याची जबाबदारी प्रथमच निर्मला सितारामण यांच्यावर सोपविली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस राजकारणात आपल्या वारसदारांना पुढे आणत असताना आम्ही घरा घरात उज्ज्वला योजना, घरोघरी शौचालय, सौभाग्य योजनेतून घर तेथे वीज, बेघरांना घर देण्याचा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवून देशाचा विकास करीत आहोत. आमदार महेश लांडगे हे भाजपा बरोबर आहेत. त्यांना बरोबर घेऊनच शहरात भाजपाची ताकद वाढविणार आहोत, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

आमदार महेश लांडगे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, शिवांजली सखी मंचच्या वतीने ‘इंद्रायणी थडी’ जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून महिलांमधील अंगभूत गुणकौशल्य विकसित व्हावेत यासाठी कला, क्रिडा, संस्कृती, उद्योजकता, रोजगार, आरोग्य याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. 11 फेब्रुवारी 2019 महिला भगिनींनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन केले.