नशिबवान ! पिंपरीमध्ये हायटेंशन तारेला चिटकलेला तरूण बचावला

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन – पत्र्याच्या छतावरील भंगार जमा करत असताना पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली परिसरात एक तरुण विद्युत प्रवाह हायटेंशन तारेला चिटकला होता. मात्र, काही क्षणात तो फेकला गेल्यामुळे तो गंभीर भाजला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी असलेल्या तरुणाच नाव समजू शकलेले नाही.

चिखली मोरे वस्ती येथील सूर्या हॉटेलमध्ये काम करणारा तरुण काल दुपारी दीड वाजेच्या सुमारास हॉटेलच्या पत्र्याच्या छतावर गेला होता. तरुण भंगार जमा करत असताना काही फुटांवर विद्युत प्रवाह असलेल्या हायटेन्शन तारेने त्याला खेचून घेतले. काही क्षणात त्याच्या अंगावरील कपडे जळून गेले. यात तो गंभीर जखमी झाला. प्रत्यक्ष घटना पाहणार्‍या नागरिकांचा थरकाप उडाला होता. काही क्षण त्याच ठिकाणी निपचित पडल्यानंतरर तो हायटेंशन तारेच्या बाजूला आला आणि बचावला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .