मोदींच्या बायोपिकमध्ये ‘हा’ अभिनेता दिसणार अमित शाह यांच्या भूमिकेत 

मुंबई : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय नरेंद्र मोदीं यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर अभिनेत्री बरखा बिश्त ही मोदींच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. आता अजून एका भूमिकेविषयी वृत्त समोर आले आहे. या चित्रपटात अमित शाह यांची भूमिका कोणता अभिनेता साकारणार हे समोर आले आहे.

मराठी, हिंदी चित्रपटातले अभिनेते मनोज जोशी हे अमित शाह यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेविषयी मनोज जोशी यांनी सांगितले, ‘अमित शाहांच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं तेव्हा क्षणाचाही विलंब न करता मी होकार दिला. मी आतापर्यंत साकारलेल्या सर्व भूमिकांपेक्षा ही भूमिका वेगळी असणार आहे ‘असं मत त्यांनी व्यक्त केलं.

चित्रपटाचे निर्माते संदीप सिंह यांनी सांगितले, ‘भाजप अध्यक्ष अमित शाह यांची उत्तम भूमिका मनोज जोशींशिवाय दुसरा कोणताही अभिनेता उत्तम प्रकारे साकारू शकत नाही म्हणूनच मनोज यांचीच निवड भूमिकेसाठी करण्यात आली आहे’.

मनोज जोशी यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये विनोदी, खलनायक किंवा गंभीर अशा विविध भूमिका केल्या आहे. या चित्रपटात बोमन इराणी, दर्शन कुमार, सुरेश ओबेरॉय हे कलाकार सुद्धा दिसणार आहे. हा चित्रपट २३ भाषांमध्ये रिलीज होणार आहे.