सरकारच्या निर्णयाच्या निषेधासाठी तिने भर स्टेजवर असे काही केले की सर्व झाले ‘अवाक’; अभिनेत्री कोरेन मासिरोचे कृत्य

पॅरीस : आपला विरोध दर्शविण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करतात, पण फ्रान्सच्या ५७ वर्षाच्या अभिनेत्री कोरेन मासिरो यांनी विरोध करण्यासाठी जो मार्ग अवलंबला. त्यामुळे कार्यक्रमातील सर्व जण अवाक झाले. सीझर अ‍ॅवॉर्ड कार्यक्रमात हा प्रकार घडला. हा पुरस्कार फ्रान्समध्ये ऑस्करच्या दर्जाचा मानला जातो.

सरकारच्या एका निर्णयाचा विरोध करण्यासाठी मासिरोने पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर जाताच स्वत:चे कपडे उतरविले. विशेष म्हणजे मासिरो यांना उत्तम पोशाख या प्रकारात पुरस्कार देण्यात येत होता.

फ्रान्समध्ये कोरोना संसर्गामुळे चित्रपटगृहे व नाट्यगृहे गेल्या डिसेंबरपासून बंद आहेत. त्यामुळे अनेक कलाकार त्रस्त आहेत. सोशल डिस्टंन्सिंगच्या माध्यमातून सीझर अ‍ॅवॉर्ड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मासिरो यांनी गाढवाचा पोशाख केला होता. पुरस्कार घेण्यासाठी मासिरो या स्टेजवर जाताच त्यांनी सर्व कपडे काढून टाकले. त्यांची ही कृती बघून सर्व जण थक्क झाले. मासिरो यांनी त्यांच्या शरीरावर कल्चर नाही तर भविष्य नाही असा खास संदेशही सरकारसाठी लिहिला होता. त्याचबरोबर आमची कला आम्हाला परत द्या, अशी मागणी करणारा मेसेज ही त्यांनी फ्रान्सच्या पंतप्रधानांसाठी लिहिला होता. सरकारने ज्या प्रकार अन्य क्षेत्रावरील बंदी मागे घेतली. त्याप्रमाणे चित्रपटगृहे, नाट्यगृहावरील बंदी मागे घेण्याची मागणी शेकडो कलाकारांनी केली आहे.