पुण्यात नातेवाईकानं 19 वर्षीय विवाहीतेचे अश्लील फोटो टाकले ‘सोशल’वर, पतीच्या बदनामीची धमकी देत उकळली खंडणी

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुण्यात एका महिलेचे सोशल मिडीयावर बनावट खाते उघडून त्याच्यावर अश्लिल फोटो टाकण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. तर महिलेला तिच्या पतीची बदनामी करण्याची धमकी देत 5 हजार रुपये उकळले आहेत. मार्च ते १२ जून २०२० दरम्यान हा प्रकार घडला.

याप्रकरणी १९ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार चंदननगर पोलीस ठाण्यात नातेवाईकावर आयटी अक्ट नुसार, विनयभंग व खंडणीची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या नावाने फेसबुक, इन्स्टाग्राम, टिकटॉकवर बनावट खाती उघडली. त्या अकाउंटर महिलेचे न कळत काढलेले अश्लिल फोटो टाकले. तसेच, त्या ठिकाणी महिलेचा क्रमांक टाकला. यामुळे महिलेला खूपच मानसिक त्रास झाला. आरोपीने महिलेला फोन करून पतीची देखील बदनामी करण्याची धमकी दिली.

तसेच बदनामी न करण्यासाठी तिच्याकडे १५ हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पण, महिलेकडे एवढे पैसे नसल्यामुळे तिने पाच हजार रुपये आरोपीला दिले. पण, महिलेला आरोपीचा त्रास वाढल्यानंतर तिने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेतली. अधिक तपास चंदननगर पोलिस करत आहेत.