पुण्यात तरूणीला रस्त्यात आडवून मारहाण, अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  फोन उचलत नसल्याच्या कारणावरून तरुणीला रस्त्यात आडवून मारहाण करत तिच्या चेहऱ्यावर असीड फेकण्याची धमकी दिल्याची घटना चतुःश्रुंगी भागात घडली आहे. पोलिसांनी विनयभंग व मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी १८ वर्षीय तरुणीने चतुःश्रुगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अक्षय पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी व आरोपीची ओळख आहे. तरुणी ही पाषाण परिसरातून जात होती. त्यावेळी आरोपी हा रिक्षातून त्या ठिकाणी आला. तरुणीला अडवून तू माझे फोन का उचलत नाही, असे बोलून तरुणीच्या कानाखाली मारली. तसेच, तिचा विनयभंग केला. त्यानंतर या पुढे कुठे दिसली तर असीड फेकण्याची तरुणीला धमकी दिली. या घटनेमुळे तरुणी खूपच घाबरली होती. तिने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर त्यांनी चर्चा करून पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास चतुःश्रुंगी पोलिस करत आहेत.