पुणे महापालिकेतही भाजप – शिवसेना आणि रिपाइं महायुती

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – केंद्र आणि राज्यात युती जाहीर झाल्यानंतर आज महापालिकेतही भाजप – शिवसेना आणि रिपाइं महायुती दिसून आली. निमित्त होते स्थायी समिती अध्यक्षपद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याचे.

भाजपचे नगरसेवक सुनिल कांबळे यांना स्थायी समिती अध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली. आज कांबळे यांनी उमेदवारी अर्ज केला. तर विरोधकांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्मिता कोंढरे यांना उमेदवारी देण्यात आली.

कांबळे यांचा अर्ज दाखल करताना शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक उपस्थित होते. रिपाइं सत्तेत असून त्यांचेही सदस्य यावेळी उपस्थित होते. यामुळे दोन वर्षांपूर्वी महापालिका निवडणुकीत स्वतंत्र निवडणूक लढलेले भाजप शिवसेना दोन आठवड्यांपूर्वी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केल्यानंतर पुणे महापालिकेतही चित्र बदलल्याचे पाहायला मिळाले.