Video : पुण्यात लॉकडाउन नाही; मात्र कडक निर्बंध – महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात मुंबई, पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. मध्यंतरीच्या काळात पुणे, मुंबईतील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असताना पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. मंगळवारी शहरातील कोरोनाबाधितांची संख्या हजारांच्यावर पोहाेचली. त्याच पार्श्वभूमीवर शहरातील कोरोना वाढत्या प्रादुर्भावाला नियंत्रणात आणण्यासाठी आगामी काळात लॉकडाउन नाही, तर लग्नसोहळे, मंगल कार्यालये, जिम, स्वीमिंग टँक याबाबत आणखी एक कडक निर्बंध लावण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहेत.

पुणे शहरात वाढत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत कोरोनाबाबतची आढावा बैठक येत्या दोन दिवसांत होणार आहे. या बैठकीत काही निर्बंध लावण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी येत्या काळात संध्याकाळच्या वेळेस शहरातील उद्याने बंद करणे, स्वीमिंग पूल आणि मंगल कार्यालयाबाबत निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा वाढता आलेख पाहून हा निर्णय घेतला जाणार आहे.

येत्या दोन दिवसांत बैठक

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चिंतेचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसांत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यात शहरातील लग्नसोहळे, मंगल कार्यालये, जिम, स्वीमिंग, उद्याने यांच्यासह नागरिकांवर आणखी कठोर बंधने लादण्याबाबत निर्णय घेतले जाणार आहेत.