पुण्यात प्रेमप्रकरणातून तरुणाची मुंडके छाटून क्रूरपणे हत्या 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथे राजपाल बिल्डर यांच्या मोकळ्या प्लॉटवर कंपाउंड लगतच्या खड्ड्यात  दिनांक १९ जून रोजी शीर कापलेले अर्धनग्न धड सापडले होते.  ज्या अवस्थेत हे धड मिळाले होते त्यावरून अज्ञात इसमांनी कोणत्यातरी कारणातून तीक्ष्ण हत्याराने पोटावर ,हातावर वार करून त्याची हत्या केली होती. तसेच कोणालाही ओळख पटू नये याकरिता त्याचे मुंडके छाटून टाकण्यात आले होते.  रमेश भीमराव इंगळे (२०)असे या  मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी   कोंढवा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाच्या विरुद्ध कलम ३०२ ,२०१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या गुन्ह्याचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलं असून हा खून प्रेमसंबंधातून झाल्याचे उघड झालं आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, काही वर्षांपूर्वी  मृत झालेल्या युवकाचे नात्यातीलच एका मुलीशी प्रेमसंबंध होते. पण दिड वर्षांपूर्वी त्यांचे ब्रेक अप झाले होते मात्र नातेवाईकांना त्यांचे प्रेमप्रकरण अजून देखील सुरु आहे असे वाटत होते. त्यामुळे आरोपीने इंगळेला ईद दिवशी शीर  खुरमा खाण्याच्या निमित्ताने अज्ञात ठिकाणी बोलावले. यावेळी त्या दोघांच्यात वादावादी झाली. तेव्हा आरोपीने इंगळेच्या गळ्यावर सपासप वर करून त्याची हत्या केली.

संबंधित युवकाची हत्या केल्यानंतर त्याची ओळख कोणालाही पटू नये याकरिता मृत व्यक्तीच्या अंगावरील कपडे काढून त्याचे शीर धडावेगळे केले होते.मात्र पोलिसांनी अतिशय कुशलतापूर्वक तपास करत मृत व्यक्तीच्या कपड्यावरून तो व्यक्ती नेमका कोण आहे याचा तपास लावला. मृत युवकाने बॉडी बिल्डिंग स्पर्धेचा टी शर्ट  घातला होता. ज्यावर फलटण असे लिहले होते. तेव्हा पोलिसांनी या प्रकरणात तपास करताना जितक्या लोकांना असे टी  शर्ट वितरित केले होते त्यांच्या सर्वांची माहिती मागवली. ज्यात मृत युवकाबद्दल देखील माहिती होती. त्याबरोबरच १८ जून पासून युवक  बेपत्ता होता. युवकाच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करायला सुरुवात केली. तपासनानंतर काही लोकांनी मृत युवकाला आरोपीसोबत पाहिल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपीवरील संशय अधिकच बळावला मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी निजाम आसगर हाशमी (१८) या अण्णांभाऊ साठे नगर ,इंदिरानगर बीबवेवाडी याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. या चौकशी दरम्यान त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपी निजाम आसगर हाशमी याला मृत उमेश इंगळे याचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई परिमंडळ-4 चे पोलीस उपायुक्त दिपक साकोरे, वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटी, कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी मिलिंद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिंदे, पोलीस उपनिरीक्षक कुलाळ,  पोलीस उपनिरीक्षक पालांडे, राजस शेख,सचिन शिंदे, संभाजी नाईक, पोलीस नाईक पृथ्वीराज पालंडे, योगेश कुंभार, संजू कळंबे, गणेश गायकवाड, रिकी भिसे,आदर्श चव्हान, अजिम शेख,दिपक क्षिरसागर, आनंद धनगर, प्रशांत कांबळे, जगदीश पाटील यांनी केली.