शेतकरी आंदोलन : पंजाबमध्ये भाजप आमदाराला मारहाण, कपडेही फाडले

चंदीगड : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या चार महिन्यांपासून केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलन सुरु आहे. दरम्यान शनिवारी (दि. 27) पंजाबमधील मलोट शहरात आंदोलनकर्त्या संतप्त शेतक-यांनी अबोहर येथील भाजपचे आमदार अरुण नारंग यांना मारहाण करून त्यांचे कपडे फाडले आहेत. हल्ल्यात आमदार नांरग जखमी झाले असून मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या घटनेमागे पंजाब काँग्रेस सरकार असल्याचा आरोप आमदार अरुण नारंग यांनी केला आहे. भाजप कार्यालयात माध्यमांना संबोधित करण्यासाठी नारंग मुक्तासर जिल्ह्यातील मलोट येथे पोहोचताच गोंधळ सुरू झाला. निदर्शक आधीच तिथे आले होते. त्यांनी नारंग यांना सांगितले की ते केंद्र सरकारच्या शेतकर्‍यांविरोधात पारित केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात आहेत. आंदोलकांनी आमदार नारंग यांना कार्यक्रमस्थळी पोहोचू दिले नाही आणि त्यांच्या गाडीवर काळा रंग फेकला. तसेच त्यांना मारहाण करून कपडेही फाडले. यावेळी झालेल्या झटापटीत एक वरिष्ठ पोलिस अधिकारी जखमी झाला आहे. दरम्यान केंद्राच्या 3 कृषी कायद्यांना पाठिंबा दिल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष अश्विनी शर्मा यांच्यासह पक्षाच्या नेत्यांना गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांचा रोषाचा सामना करावा लागत आहे.