सांगलीत पोलिस मुख्यालयात सखी कक्ष सुरू

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – देशात महिला अत्याचार वाढत असल्याचे बोलले जाते, मात्र सांगली जिल्ह्यात याचे प्रमाण नगण्य आहे. तरीही जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी पोलिस मुख्यालयात सखी कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अधीक्षक शर्मा म्हणाले, पोलिसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी सक्षमा प्रकल्प गेल्या वर्षीपासून हाती घेतला आहे. यामाध्यमातून चारशेवर अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. नव्या वर्षात पोलिसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणखी प्रयत्न करणार आहे. या वर्षभरात गुन्हेगारीत घट झाली आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारीचा समुळ नायनाट करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. 2018 च्या तुलनेत यंदा गुन्हेगारी कमी करण्यात यश आले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी गुन्हे दाखल संख्या 3 टक्‍क्‍यांनी कमी आहे. संघटित गुन्हेगारी करणाऱ्या 24 टोळ्यांतील 169 गुन्हेगारांवर मोकांतर्गत कारवाई करण्यात आली. घरफोडीचे 126 गुन्हे घडले. त्यापैकी 60 टक्के गुन्ह्यांचा तपास लागला आहे.

चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात घट झाली आहे. घरफोडीतील 50 लाखांपेक्षा अधिक रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला आहे. अवैध शस्त्र विक्रीचे 18 गुन्हे उघडकीस आणले असून त्यात 28 पिस्तूल व 51 जिवंत काडसुते जप्त करण्यात आले आहे. गांजा विक्रीप्रकरणी 106 जणांवर कारवाई केली आहे. ई चलनद्वारे दंड वसुलीतही जिल्हा राज्यात प्रथम आहे. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या 5407 जणांवर कारवाई करीत 80 लाखांचा दंड वसूल केला आहे.

जिल्ह्यात गुन्हेगारीत अल्पवयीन मुलांची संख्या अधिक आहे. या मुलांना गुन्हेगारीतून परावृत्त करून त्यांना समुपदेश करण्यासाठी दिशा उपक्रम राबवण्यात आला. यामाध्यमातून 19 मुले गुन्हेगारीचा मार्ग सोडून स्वत:चा रोजगार करू लागले आहेत. तर 8 जणांनी पोलिस भरतीमध्ये सहभाग करून घेतले आहे.

यावेळी पोलिस उपाधीक्षक अशोक वीरकर, एलसीबीचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे, वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक अतुल निकम उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/