सांगली कारागृहात तब्बल 63 कैद्यांना ‘कोरोना’ची बाधा

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली जिल्हा कारागृहातील 63 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे खळबळ माजली आहे. धक्कादायक म्हणजे त्यामध्ये एक कैद्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली असून तो जामिनावर जेलबाहेर सुटला आहे. त्यामुळे त्याला शोधण्यासाठी धावधाव सुरू झाली आहे.

सांगलीच्या जिल्हा कारागृहात एकाचवेळी 62 जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हा आणि कारागृह प्रशासन खडबडून जागे झाले आहे. खबरदारी म्हणून या 62 कैद्यांचे जेलमध्येच अलगिकरण केले जात असून यातील 50 वर्षांवरील कैद्यांना अन्यत्र ठेवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारीचा उपपयोजना हाती घेण्यात आल्या आहेत. तीन दिवसांपूर्वी जेल प्रशासनाकडून जेलमधील 94 बंदिवान आणि कर्मचारी यांची रॅपिड टेस्ट घेतली होती. या टेस्टचा रिपोर्ट रविवारी रात्री आल्यानंतर जेल प्रशासनाला धक्का बसला.

एकाचवेळी 63 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जेल प्रशासन हादरून गेले आहे. सर्वात चिंतेची बाब म्हणजे, हे पॉझिटिव्ह आलेले सर्व कैदी हे अन्य कैद्यांसोबत एकत्र असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची मोठी भीती आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून या पॉझिटिव्ह कैद्यांचे अलगिकरण केले जात असून 50 वर्षांवरील कैद्यांना इतर ठिकाणी हलवण्यात येणार असल्याचे कारागृह प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.