चाकूच्या धाकानं बलात्काराचा प्रयत्न, 19 वर्षीय तरूणीनं भोसकून 24 वर्षीय तरूणाचा केला ‘खात्मा’

कोइंबमतूर : पोलिसनामा ऑनलाईन – एका तरुणीने स्वसंरक्षणार्थ तिच्यावर बलात्काराचा (Rape) प्रयत्न करणाऱ्या २४ वर्षीय तरुणाची हत्या केली. ही घटना तामिळनाडूमधील तिरुवेल्लूर जिल्ह्यामध्ये घडली. ही तरुणी शनिवारी रात्री आठच्या सुमारास लोकवस्तीपासून काही अंतरावर असणाऱ्या झाडाझुडपांमध्ये शौचासाठी गेली असता हा प्रकार घडला. चाकूचा धाक दाखवून या १९ वर्षीय मुलीवर बलात्कार (Rape) करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला तरुणाचा या सर्व झटापटीमध्ये मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, टाइम्स न्यूज नेटवर्कच्या वृत्तानुसार पोन्नारीच्या पोलिस उपअधीक्षक कल्पना दत्त यांनी या प्रकरणामध्ये पोलीस खात्याने कायदेशीर सल्ला मागवला असून या १९ वर्षीय तरुणीला अटक केली जाण्याची शक्यता खूपच कमी असल्याचेही म्हटले आहे.

याच गावात राहणारा एस. अजितकुमार हा याच मुलीच्या नात्यातील असून तो तिचा पाठलाग करत होता. बियरची बाटली हातात घेतलेल्या अवतारात अजितकुमारला पाहून हि मुलगी घाबरली. या तरुणाने तिच्या गळ्यावर चाकू ठेऊन तिच्यावर बलात्कार करण्याची धमकी दिल्याचे या मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये सांगितलं आहे. हा तरुण स्वत:चे कपडे काढू लागला तेव्हा या मुलगी त्याच्याकडे गयावया करु लागली. मला जाऊ दे, मी कोणालाही काहीही सांगणार नाही अशी विनंती ती करत होती. मात्र त्याच्यावर याचा काहीच परिणाम झाला नाही. अखेर हा तरुण मद्यधुंद अवस्थेत असल्याचे लक्षात आल्यानंतर या तरुणीने त्याला जोरात धक्का दिला. हा तरुण जवळच्या झाडावर आदळला तेव्हा त्याच्या हातातील चाकू खाली पडला.

पडलेला चाकू उचलून या तरुणीने एस. अजितकुमारच्या गळ्यावर अनेकदा वार केले. या हल्ल्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. रात्री नऊच्या सुमारास ही तरुणी स्वत:च स्थानिक पोलीस स्थानकात पोहचली आणि तिने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी या तरुणीने दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी धाव घेतली असता तिथे या तरुणाचा मृतदेह त्यांना आढळून आला. शवविच्छेदनासाठी हा मृतदेह स्टेनली रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असला तरी कोणाल अटक करण्यात आलेली नाही.

पोन्नारीच्या पोलिस उपअधीक्षक कल्पना दत्त यांनी दिलेल्या माहितीनुसार ही तरुणी दहावीच्या परिक्षेची तयारी करत आहे. तर अजितकुमारला दोन मुलं असून तो या तरुणीच्या मावशीचा मुलगा होता. घरगुती वादामुळे काही महिन्यांपूर्वीच अजितकुमार त्याच्या पत्नीपासून वेगळा झाला होता. सध्या तरी घडलेला सर्व प्रकार हा स्वसंरक्षणासाठी घडल्याचे दिसून येत आहे. याशिवाय या प्रकरणामध्ये दुसरा कोणताही हेतू दिसून येत नाही,” असं पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणात त्यांचा अहवाल न्यायालयासमोर सादर करणार असून त्यानंतरच पुढे काय करायचं हे ठरवलं जाणार आहे. दरम्यान, अजितकुमार हा बेरोजगार आणि दारुचा व्यसन असलेल्यांपैकी होता. यापूर्वीही त्याच्याविरोधात चोरीचे गुन्हे दाखल असल्याचेही पोलिसांनी सांगितले. तो नेहमी स्वत: जवळ चाकू ठेवायचा, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.