शिर्डीत वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार बदलला अरुण साबळेंचा पत्ता कट, ‘यांना’ दिली उमेदवारी

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सांगली लोकसभा मतदार संघाचा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार बदलण्यात आला. आता वंचित बहुजन आघाडीकडून शिर्डी येथील उमेदवार बदलण्यात आल्याची माहिती मिळते आहे. वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संजय सुखदान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी डॉ. अरुण साबळे यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र आता तांत्रिक कारण देत वंचित बहुजन आघाडीने शिर्डी लोकसभा मतदार संघातील उमेदवार बदलला आहे. संजय सुखदान यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दिनांक २९ मार्च रोजी संजय सुखदान यांनी काँग्रेस पक्षाचा आणि त्यांच्या तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर १ तारखेला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना ते भेटण्यासाठी गेले होते. त्यामुळे ते वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करणार या चर्चेला उधाण आले होते. त्यांना आगामी लोकसभेसाठी शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा होती मात्र काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी देण्याबाबत कोणतीच चिन्हे नव्हती त्यामुळे नाराज झालेले संजय सुखदान हे अपक्ष लढणार अशा चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. अखेर त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आणि त्यांना शिर्डी लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देखील देण्यात आली आहे.